नवी दिल्ली, 22 डिसेंबर : जवळपास गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारी पसरलेली आहे. आतापर्यंत कोरोना विषाणूचे विविध व्हेरियंट सापडले आहेत. या व्हेरियंट्समुळे कोट्यवधी लोकांना कोरोनाची लागण झालेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यानच्या काळात ओमिक्रॉननंतर कोरोना महामारीचा शेवट होईल, अशी खात्री होताना दिसत होती. मात्र, जगावर असलेलं कोरोना महामारीचं संकट संपलेलं नसल्याचं चित्र आहे.
ज्या देशापासून कोरोनाची सुरुवात झाली होती, त्याच चीनपासून पुन्हा जगाला कोरोनाचा धोका आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चीनमध्ये कोरोनानं धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रुग्णालयांमध्ये जागा मिळेनाशी झाली आहेत. तेथील स्मशानभूमीचे भयावह फोटो समोर आले आहेत. या सर्व दृश्यांनी भारतीयांना 2020-21 च्या एप्रिल-मे महिन्याची आठवण करून दिली.
तो काळ भारतीय लोकांसाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. रस्त्यावर चालणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या रांगा, प्रत्येक गोष्टीला हात लावण्याची भीती, अफवांमधून जन्मलेल्या खोट्या-खऱ्या कथा आणि हॉस्पिटलमध्ये झालेली जीवन-मरणाची लढाई, या सर्व गोष्टी भारतीयांनी त्यावेळी अनुभवल्या होत्या. भारतातही चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या BF.7 व्हेरियंटचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा : Big Breaking : भारतातही कोरोनाची एन्ट्री, परदेशातून आलेल्या महिलेला नव्या व्हेरियंटची लागण
इच्छा नसतानाही चीन दीड वर्षानंतर पुन्हा त्याच टप्प्यातून जात आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. औषधांचा तुटवडा भासत आहे. अनेक शहरांमध्ये निर्बंध लावले आहेत. आजारी लोक उपचारांसाठी बाहेर पडत आहेत. भारतही अशा स्थितीत पोहोचू नये, अशी प्रार्थना चीनची स्थिती पाहून भारतीय करत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पुन्हा मास्क सक्ती, सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन, प्रवासासाठी कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती केली जाऊ शकते. परिस्थिती थोडी गंभीर झाली तर भारतातही लॉकडाउन होऊन पुन्हा निर्जन रस्ते दिसू शकतात. मात्र, सध्या त्याची शक्यता नगण्य आहे.
व्हॅक्सीन
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, देशातील बहुतेक लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पण, बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. फक्त 27 ते 28 टक्के नागरिकांनीच बूस्टर डोस घेतले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे की, लोकांनी बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. लोकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी बूस्टर डोस घ्यावा. देशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर झाली तर सरकार तिसरा डोस घेण्याची सक्ती करू शकतं.
मास्क
मास्क घालून तोंड आणि नाक झाकण्याचे जुने दिवस परत आले आहेत. सर्वांनी आजपासूनच मास्क घालायला सुरुवात करण्याची सूचना मिळाली आहे. बुधवारी (21 डिसेंबर) केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, ‘कोविड अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधित विभागांना दक्षता वाढवण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी मास्कचा वापर सुरू करावा.’ नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांनीही म्हटलं आहे की, जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात तर मास्कचा नक्की वापर करा. मात्र, याबाबत सरकार किंवा आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप कोणताही अधिकृत व बंधनकारक आदेश जारी करण्यात आलेला नाही. सरकारने सध्या केवळ सल्ला म्हणून काही सूचना दिल्या आहेत.
सोशल डिस्टन्सिंग
चीनमधील कोरोनाच्या BF.7 व्हेरियंटचा कहर पाहता, पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यास सुरुवात केली पाहिजे. भारतात आत्तापर्यंत BF.7 चे पाच रुग्ण आढळले आहेत. या वर्षी जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. BF.7 व्हेरियंट अत्यंत संसर्गजन्य आहे आणि एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे तो खूप लवकर पसरतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी आज तकला सांगितलं की, नागरिकांनी घाबरू नये. फक्त काळजी घेणं आवश्यक आहे. कोविडच्या नियमांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. बाहेर पडताना मास्क वापरला पाहजे. तुम्ही लग्न समारंभ, इतर फंक्शन, सिनेमा हॉल, ऑडिटोरियम यांसारख्या ठिकाणी गेलात तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. वृद्ध किंवा आजारी नागरिकांनी तर विशेष काळजी घेतली पाहिजे.
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास, सार्वजनिक कार्यक्रम, रॅली, मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येवर सरकार नियंत्रण आणू शकतं. यासोबतच शहरांमध्ये लोकांची गर्दी रोखण्यासाठी कलम 144 लागू केलं जाऊ शकतं.
हे ही वाचा : कोरोनाची धास्ती; 2 वर्ष मायलेकीनं स्वतःला घरात कोंडून घेतलं, शेवटी प्रकृती ढासळली अन्…
टेस्ट आणि स्क्रिनिंग
भविष्यातील धोका बघता अनेक राज्यांनी टेस्ट आणि स्क्रिनिंगची तयारी सुरू केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीनसह अनेक देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांचं रँडम सॅम्पल टेस्टिंग केलं जाईल. कर्नाटकदेखील बेंगळुरूतील कॅम्पेगौडा विमानतळावर परदेशातून येणाऱ्या लोकांचीही तपासणी करणार आहे. यूपी सरकारनंही गेल्या काही दिवसांत परदेशातून आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात सध्या मेट्रो, बस, रेल्वे आणि विमानात प्रवास करण्यासाठी कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. मात्र, येत्या काही दिवसांत कोरोना नियंत्रणाबाहेर गेल्यास सरकार पुन्हा 2020-21 प्रमाणे कठोर नियम लागू करू शकतं.
होम आयसोलेशन
कोरोनाच्या काळात होम आयसोलेशन ही अत्यावश्यक वैद्यकीय पद्धत बनली होती. रुग्णालयांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारांनी लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांना घरातच राहण्यास सांगितलं होतं. दिल्ली सरकारने अशा रुग्णांसाठी एसओपी निश्चित केली होती. तेव्हा ही पद्धत खूप प्रभावी ठरली होती. सध्या देशात होम आयसोलेशन लागू करण्यासारखी परिस्थिती नाही. रुग्णालयांची स्थिती अतिशय चांगली आणि सुरळीत आहे. गेल्या दोन वर्षात उपचार सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार वाढला तरी परिस्थिती फार लवकर हाताबाहेर जाणार नाही.
वर्क फ्रॉम होम
कोरोनाच्या काळात घरून काम केल्यानं कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडित तरुणांना मोठा आधार मिळाला होता. आरोग्य, विमा, मीडिया, अकाउंट्स, शिक्षण, कायदा, कॉल सेंटर, बीपीओ यांच्याशी संबंधित लाखो लोकांनी कोरोनाच्या काळात घरातून काम करून आपलं कुटुंब चालवलं. एप्रिल 2020 पासून सुरू झालेली ही कामाची पद्धत आजही अनेक कंपन्यांमध्ये सुरू आहे. तर, काहींनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवलं आहे.
काही महिन्यांपूर्वी दिल्ली-हरियाणामध्ये प्रदूषणामुळे स्थिती बिघडली होती. तेव्हा तेथील सरकारनं पुन्हा एकदा कंपन्यांना वर्क फ्रॉम होम सुरू करण्याचं आवाहन केलं होतं. जर देशात कोरोनाचा संसर्ग वाढला तर अनेक कंपन्या पुन्हा एकदा त्यांच्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची परवानगी देऊ शकतात. मात्र, सध्या भारतातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी आहे. त्यामुळेच सध्या पुन्हा वर्क फ्रॉम होम सुरू होण्याची शक्यता फार कमी आहे.
लॉकडाउन
कोरोनामुळे 24 मार्च 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या लॉकडाउनची घोषणा केली होती. तोपर्यंत अनेक राज्यांनी आपापल्या भागात आंशिक लॉकडाउन लागू केलं होतं. यानंतर 2021 मध्येही लॉकडाउन करण्यात आलं होतं. पण, ते देशभर नव्हतं. पुढच्या टप्प्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपापल्या गरजेनुसार लॉकडाउन लावत होतं. नंतर, राज्य सरकारांनी कोरोना लॉकडाउनऐवजी कंटेन्मेंट झोन तयार करण्यावर भर दिला होता. जेणेकरून लॉकडाउनचे आर्थिक दुष्परिणाम टाळता येतील. सध्या देशात लॉकडाउन करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली नाही.
2020 आणि 2021 मध्ये भारतानं कोरोनाच्या काळात जी परिस्थिती पाहिली ती आताची पिढी कधीच विसरू शकणार नाही. प्रदीर्घ लॉकडाउनचा काळ आपण पाहिला आहे. त्याची पुनरावृत्ती व्हावी, अशी कोणाचीही इच्छा नसेल. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पाळण्यास सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून रुग्णसंख्या नियंत्रणात राहील.