पटना, 22 एप्रिल : वटवाघूळ (bats) म्हटलं तरी धडकी भरते. कारण सध्या जगभर जो कोरोनाव्हायरस (coronavirus) थैमान घालतो आहे, ज्याने आतापर्यंत 25 लाखांपेक्षा जास्त लोकांना विळखा घातला आहे आणि एक लाखापेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला आहे, त्या कोरोनाव्हायरसचा स्रोत वटवाघूळ असावा, असं म्हटलं जातं. तरीही देशातील एका गावात मात्र या वटवाघळाची पूजा केली जाते, असं तुम्हाला सांगितलं तर थोडं आश्चर्यच वाटेल.
वटवाघळाच्या शरीरात कोरोनाव्हायरस असतात. भारतातही 2 प्रजातींच्या वटवाघळांमध्ये कोरोनाव्हायरस सापडलेत. त्यामुळे एकिकडे वटवाघळाची भीतीच वाटते आहे, तर दुसरीकडे भारतात मात्र बिहारमध्ये (bihar) वैशाली जिल्ह्यातील सरसई गावात (sarsai village) वटवाघळांची पूजा केली जाते.
हे वाचा - कुणामार्फत पसरला कोरोनाव्हायरस? जागतिक आरोग्य संघटनेनं दिलं उत्तर
त्यांना शुभ मानलं जातं. वटवाघूळ आपली रक्षा करतात, असंही इथल्या लोकांना वाटतं.
अमर उजालाने याबाबत वृत्त दिलं आहे.
का केली जाते वटवाघळांची पूजा?
या गावात वटवाघळांची पूजा करण्याची प्रथा कित्येक वर्षांपासून आहे. असं म्हटलं जातं की इथं एका महासाथीनं थैमान घातलं होतं. त्यामुळे कित्येक लोकांचा जीव गेला होता. त्याचवेळी या ठिकाणी मोठ्या संख्येनं वटवाघळं आली आणि त्यानंतर मात्र या महासाथीचा उद्रेक झाला नाही. तेव्हापासून इथली लोकं वटवाघळांना शुभ मानू लागली. गावातील कोणतंही शुभकार्य वटवाघळांच्या पूजेशिवाय पूर्ण मानलं जात नाही. वटवाघळं समृद्धीची देवी लक्ष्मी समान असल्याचं मानलं जातं. सरसईतील पिंपळाच्या झाडावर असलेल्या वटवाघळांच्या संख्येत वाढ होते आहे. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकही येतात.
वटवाघळांमुळे होणारे फायदे
गेल्या काही महिन्यांत वटवाघळांबाबत माणसांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. मात्र या वटवाघळाचे माणसांसाठी खूप फायदे आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, वटवाघूळ शेतीला नुकसान पोहोचवणाऱ्या किडे, कीटकांना खातात. त्यांच्या मलामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशिअमसारखे घटक असतात, जे जैविक खताचं काम करतात.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - कोरोना योद्धा! रुग्णांसाठी टॅक्सी चालकाने लावली जीवाची बाजी, केली अशी मदत मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.