नवी दिल्ली, 24 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (UK)आढळून आलेल्या नवीन कोरोना विषाणू (New Corona Virus)अधिक घटक आणि वेगानं फैलावाणारा असल्यानं जगभरात सर्वत्र खळबळ माजली आहे. वेळीच याचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीनं खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. भारतानंही खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनमधून 22 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 31 डिसेंबरपर्यंत या कालावधीत येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. तसंच विमानतळांवर प्रवाशांची कोविड चाचणी (Covid Test)अनिवार्य करण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांना तत्काळ आयसोलेशन युनिटमध्ये (Isolation Unit)दाखल करण्यात येत असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. यासंदर्भात सरकारनं मार्गदर्शक सूचनाही (Sop) जारी केल्या आहेत. दरम्यान, दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) मंगळवारी ब्रिटनहून आलेल्या एअर इंडियाच्या लंडन -दिल्ली विमानातील 500 प्रवाशांपैकी पाच प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले. मात्र त्यापैकी दोन प्रवासी व्यवस्थापन यंत्रणेची नजर चुकवून पळून जाण्यात यशस्वी ठरले. अखेर काल त्यांचा शोध घेऊन पुन्हा त्यांना दिल्लीत आणण्यात आलं आहे. तर उर्वरित तीन प्रवाशांना लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अशी माहिती लुधियानाचे अतिरिक्त उपायुक्त संदीप कुमार यांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
पंजाबमधील (Punjab)आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनहून आलेल्या पाच प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यापैकी दोन प्रवासी तिथून पळून गेले. यातील एक 46 वर्षांचा पंजाबमधील अमृतसर इथं राहणारा पुरुष आपल्या पत्नीसह लुधियानाला (Ludhiana) पोहोचला. तिथं त्याचा डॉक्टर पुतण्या काम करत असलेल्या फोर्टीस रुग्णालयात (Fortis Hospital)तो दाखल झाला; पण प्रशासनानं त्याचा शोध घेऊन पुन्हा त्याला दिल्लीत दाखल केलं. या व्यक्तीला लागण झालेल्या कोविड विषाणूचा स्ट्रेन (Covid Visrus Strain) कोणता आहे याची खात्री अद्याप व्हायची आहे. त्याची पत्नी आणि पुतण्या यांनाही क्वारंटाईन करण्यात आलं असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, लुधियाना प्रशासनाचा या रुग्णाला पुन्हा दिल्लीला पाठवण्यास विरोध होता. यामुळं संसर्ग फैलावण्याचा धोका आहे, असं त्याचं मत होतं, मात्र आरोग्य यंत्रणेच्या सूचनेनुसार या रुग्णाला दिल्लीला पाठवण्यात आलं.
हे वाचा-Corona Vaccine मध्ये डुकराची चरबी? मुस्लिम संघटनांनी घेतला मोठा निर्णय
फोर्टीस रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. दुसरा बेपत्ता झालेला प्रवासी आंध्र प्रदेशात सापडला असून, त्यालाही दिल्लीत आणण्यात येत आहे. हे प्रवासी विमानतळावरून बाहेर कसे पडले याचा तपास करण्यात येत असून, यंत्रणेतील दोष शोधण्यात येत आहेत. व्यवस्थापन यंत्रणेतील ढिसाळ कारभार यामुळं उघड झाला आहेच; पण लोकांची बेफिकीर मनोवृत्तीही दिसून येत आहे.