अनिल पाटील ,प्रतिनिधीगोवा, 06 मार्च : जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे स्थानिक परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यातही पर्यटकांची संख्या आता रोडावू लागली आहे. या कमी होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येचा परिणाम इथल्या स्थानिक व्यवसायिकांवर होताना दिसतोय.
देशात दिल्ली जयपूर पाठोपाठ अन्य ठिकाणीही कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने इथं परदेशी पर्यटकांची ये जा ही मोठी असते. त्यामुळे गोव्यात सुरुवातीपासून कोरोना व्हायरसची भीती दिसून येत आहे.
राज्य सरकारनं अशा रुग्णांसाठी सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था केली असली तरी पर्यटकांची संख्या मात्र झपाट्याने कमी होताना दिसत आहे, अर्थात सध्या परीक्षांचे दिवस असल्याने या कमी होणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत अधिकच भर पडताना दिसत आहे.
या कमी होणाऱ्या पर्यटकांमुळे स्थानिक व्यावसायिक मात्र, हवालदिल झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायिकना चालू हंगामात जागतिक मंदीच्या परिणामांना सामोरे जातानाच आता या नव्या संकटाला कसं हाताळायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
दरवर्षी गोव्यात साधारणपणे वीस ते पंचवीस लाख पर्यटक येतात यात सहा लाखांहून अधिक पर्यटक परदेशी असतात यावर्षी पर्यटन हंगामाच्या सुरुवातीपासूनच देशी आणि परदेशी पर्यटकांची संख्या कमी होती. आता त्यात या व्हायरसच्या भीतीची भर पडल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही पर्यटक मास्क लावून फिरताना दिसत आहेत. व्यवसायिक मात्र चिंतेत आहेत.
दरम्यान, आज एका परदेशी पर्यटकांची संशयित रुग्ण म्हणून भर पडली. आतापर्यंत संशयित रुग्णांची संख्या तीन झाली असून त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.