पुणे, 17 जानेवारी: गेल्या काही काळापासून महाराष्ट्रासह देशात ओमायक्रॉन बाधित रुग्ण (Omicron cases) झपाट्याने वाढत आहेत. कोरोना व्हेरिएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेत, प्रशासनाने 15 ते 17 वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याची परवानगी (Adolescent vaccination) दिली आहे. लसीकरणाची परवानगी मिळताच 15 ते 17 वयोगटातील तब्बल 3.31 करोड मुलांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. हा आकडा या वयोगटातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 45 टक्के इतका आहे. व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवत अवघ्या 13 दिवसांत लसीकरणाचा एवढा मोठा टप्पा पूर्ण करण्यात आला आहे.
जानेवारी अखेरपर्यंत 15 ते 17 वयोगटातील 7.4 करोड मुलांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्याचा मानस प्रशासनाचा आहे. त्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून या वयोगटातील मुलांना कोरोना लशीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दुसरा डोस देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचं कोरोना लसीकरण सुरू शक्यता आहे, अशी माहिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे प्रमुख डॉ. एन के अरोरा यांनी रविवारी दिली आहे.
हेही वाचा-Omicron कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी? शास्त्रज्ञाचा मोठा दावा
तज्ज्ञांच्या मते 12 ते 17 वयोगटातीलं मुलं किशोरवयीन मानली जातात. त्यामुळे या वयोगटातील मुलांचं लसीकरण होणं गरजेचं होतं. त्यासाठी सुरुवातीला 15 ते 17 वयोगटातील मुलाचं लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. या वयोगटातील मुलांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर, 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा-पुणेकरांनो काळजी घ्या..! सलग तिसऱ्या दिवशी Corona चा विस्फोट
तसेच 12 ते 14 वयोगटातील मुलांना लसीकरण देण्यासाठी आवश्यक असणारी सर्व पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्यामुळे 15 ते 17 वयोगटातील मुलाचं लसीकरण पूर्ण होताच, 12 ते 14 वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. हे लसीकरण मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असंही डॉ. अरोरा यांनी सांगितलं आहे. खरंतर, देशातील 15 ते 17 वयोगटातील मुलांना भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सीन लस दिली जात आहे. तसेच ही लस 2 ते 17 वयोगटातील मुलांसाठी आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही लस संबंधित वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.