अलीगढ, 22 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील अलीगढ़ (Aligarh) जिल्ह्यातील दीनदयाल रुग्णालयात भरती कोरोना पॉजिटिव्ह (Corona Positive) इन्स्पेक्टरने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील क़्वार्सी भागातील सूर्य विहार कॉलनीत राहणारे इन्स्पेक्टर दिनेश शाहजहांपुरमध्ये तैनात होते. त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना दीनदयाल रुग्णालयात भरती करण्यात आलं.
कोरोनाची लागण झाल्यानंतर ते तणावाखाली असल्याचे सांगितले जात होते. त्यातच शनिवारी रात्री उशिरा त्यांनी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इन्स्पेक्टरच्या आत्महत्येच्या बातमीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तातडीने इन्स्पेक्टरला मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आलं आहे. सूचना मिळताच पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.
हे ही वाचा-नाशकात कोरोना संसर्ग वाढला! पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान महाराष्ट्रात दिवाळीच्या काळातल्या गर्दीचा परिणाम मुंबई, ठाणे, पुणे आणि सगळ्याच मोठ्या शहरांवर दिसू लागला आहे. राज्यातली कोरोना रुग्णांची (Covid-19) संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या जवळपास महिनाभरात पहिल्यांदाच दैनंदिन आकडेवारीत नव्या कोरोना रुग्णांची संख्या बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत वाढलेली दिसली. (Coronavirus daily update Maharashtra) गेल्या 24 तासांत 5,760 नव्या रुग्णांचं निदान झालं. 4,088 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात 79,873 अॅक्टिव्ह रुग्ण झाले आहेत. ही संख्या गेल्या आठवड्यात पन्नास हजारांच्या खाली आली होती. पण 18 नोव्हेंबरपासून दररोज नव्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. महाराष्ट्राचा कोरोनाचा आलेख उतरत होता, तो पुन्हा या आठवड्यात वर चढू लागल्याने चिंता वाढली आहे. मुंबई, ठाणे परिसरातल्या शाळा सुरू होणार होत्या. त्या आता डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार नाहीत. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू होणार आहेत. तिथे अद्याप कोरोनाचा आलेख चढलेला नाही. पण शहरात मात्र गेल्या महिन्याभरातला सर्वांत मोठा आकडा शनिवारी समोर आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Sucide attempt