नवी दिल्ली 15 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनावर (Farmer Protest) हरियाणातील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य सतत समोर येत आहेत. अशात आता हरियाणाच्या कृषी मंत्र्यांनंतर काँग्रेस नेत्या विद्या देवी (Vidya Devi) यांचं वादग्रस्त विधान समोर आलं आहे. काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. विद्या देवी म्हणाल्या, की आंदोलनात शेतकऱ्यांची मदत करा, पैसे वाटून किंवा दारू वाटून. विद्या देवींनी हे वक्तव्य केलं त्यावेळी तिथे काँग्रेसचे आमदार सुभाष गंगोली यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विद्या देवी जींदच्या नरवानामधून काँग्रेसकडून विधानसभेसाठी उभा होत्या.विद्या देवी यावेळी म्हणाल्या, की काँग्रेस जेव्हापासून निवडणूक हारलं आहे, तेव्हापासून पक्षाचं अस्तित्व संपलं आहे. आता हे आंदोलन कसंतरी उभा राहिलं असून आपल्याला प्रत्येक परिस्थितीत ते पुढे घेऊन जायचं आहे. त्या म्हणाल्या, की शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची मदत करा, मग ती पैशाच्या बाबतीत असो किंवा दारू. या शेतकऱ्यांसाठी दारूही दान करू शकता. जितकं शक्य होईल तितकं सहकार्य करून हे आंदोलन पुढे घेऊन जा. कृषी मंत्र्यांनीही केलं होतं वादग्रस्त विधान - हरियाणाचे कृषीमंत्री जेपी दलाल (JP Dalal) यांनीदेखील शेतकऱ्यांबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी शनिवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना, आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांबद्दल बोलताना म्हटलं, की हे घरी असते तरीही त्यांचा मृत्यू झालाच असता. जे आज घरी आहेत त्यांचा मृत्यू होत नाही का? कोणी हृदयविकारानं तर कोणी आजारामुळे मरण पावतं, असंही ते म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होत होती. पत्रकार परिषदेत असा प्रश्न विचारला गेला होता, की एखाद्या दुर्घटनेत 10 लोकांचा मृत्यू झाल्यावरही पंतप्रधान शोक व्यक्त करतात. मात्र, 200 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला यावर काहीच ट्वीट का नाही. या प्रश्नाचं उत्तर देताना कृषीमंत्र्यांनी वरील विधान केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.