• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • कोरोनाचा प्रकोप, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बोलावली काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक

कोरोनाचा प्रकोप, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी बोलावली काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक

ही बैठक काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलावली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 10 एप्रिल : काँग्रेस शासित राज्यांसह देशातील कोरोना (Coronavirus) स्थितीचा आढावा घेणारी बैठक काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलावली आहे. सकाळी साडेदहा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार असून राज्यामध्ये निर्माण झालेल्या लसीचा मुद्दा ते या बैठकीत मांडतील, अशी माहिती आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या प्रकारच्या जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे त्याचे नियोजन या बैठकीत बाळासाहेब थोरात हे मांडण्याची शक्यता आहे. देशभर कोरोनाचा उद्रेक वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर काँगेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी काँग्रेस शासित राज्यांच्या कोरोना स्थितीचा आढावा घेणारी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना प्रकोपादरम्यान काँग्रेस सेवादल आणि युवक काँग्रेसच्या वतीने सहाय्यता कार्यक्रम राबविण्यात येईल, अशी माहिती असून या बैठकीत यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - घाबरू नका, पण सावध राहा! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तज्ज्ञांकडून दिलासादायक बातमी देशात गेल्या मार्च महिन्यात जेव्हा पहिल्यांदा लॉकडाऊन लागले होते तेव्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने ठिकाणी अन्नछत्र आयोजित करण्यात आले होते. सोबतच अनेक जिल्ह्यात घरपोच राशन देण्याचा कार्यक्रम देखील घेण्यात आला होत. लॉकडाऊनमुळे होत असलेल्या स्थलांतराचा सामना करण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्त्या-रस्त्यावर सुविधा केंद्र देखील उभारण्यात आली होती. यावर्षी पुन्हा याच प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता असल्यामुळे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलाविली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आगामी काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने मदत केंद्र उभारण्यात येतील आणि देशातील कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडून कशी मदत करता येईल, यावर एक रोडमॅप ठरवला जाण्याची शक्यता आहे.
Published by:Akshay Shitole
First published: