मुंबई, 1 जून : देशाच्या राजकारणातील एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीने (ED) समन्स बजावला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी हा समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या समन्सनुसार सोनिया गांधी यांना 8 जून रोजी तर राहुल गांधींना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस मिळाल्याची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी अत्यंत काळजी वाढवणारी आहे. कारण या देशाचं पुढचं भविष्य काय? याची चिंता वाढवणारी आहे. आठ वर्षांपासून आम्ही पाहत आहोत. सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांचा छळ सुरु आहे. दुसऱ्या बाजूला धार्मिक तेढ वाढवली जात आहे. लोकशाहीवर मोठा आघात होतोय. या सगळ्या परिस्थितीत आम्ही सोनिया आणि राहुल गांधी यांच्या पाठीशी आहोत. त्याचबरोबर देशाची जनता देखील त्यांच्या पाठीशी आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ( कोलकातामध्ये Singer KK यांचं निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया, काय म्हणाल्या… ) “तपास यंत्रणांचा राजकीय कारणांसाठी गैरवापर सुरु आहे. विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण मला खात्री आहे, यामधून विरोधकांचा नामोहरण होणार नाही. उलट जनता आमच्या पाठीशी उभी राहील. शेवटी भाजपला त्यांची जागा दाखवील. जे काही चाललंय ते जनता बारकाईने पाहत आहे. जनतेमध्ये निश्चितपणे भाजप विरोधात मोठ्या प्रकारचा असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली. “सतत काहीतरी दबावाखाली ठेवणं, छळ करणं हा भाजपच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. त्यांची स्ट्रॅटेजी यातून काय आहे ते मी सांगू शकत नाही”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.