नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर वेगवेगळ्या कारणांवरुन सातत्याने निशाणा साधत असतात. त्यांनी पुन्हा आता एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांनी केलेल्या खादीच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते? गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी खादी महोत्सव आयोजित करण्यात आला. ‘स्वातंत्र्यानंतर खादीकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता हेच खादी स्वावलंबी भारतासाठी प्रेरणास्त्रोत बनत आहे. खादी जशी स्वातंत्र्याची प्रेरणा बनली, त्याचप्रमाणे ती स्वावलंबी भारतासाठीही मोठी प्रेरणा बनू शकते, असे वक्तव्य या महोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते यांनी मोदींवर निशाणा साधला. राहुल गांधी काय म्हणाले? काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विट करत म्हणाले की, ‘पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ नसतो. राष्ट्रासाठी खादी, पण राष्ट्रध्वजासाठी चीनचे पॉलिस्टर’, असा निशाणा राहुल यांनी मोदींवर साधला. दरम्यान, यापूर्वी 10 ऑगस्टला राहुल यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधत फेसबुक पोस्ट केली होती. यात त्यांनी लिहिले होते की, शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रध्वज खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. भाजप राष्ट्रवाद विकत असून गरिबांचा स्वाभिमान दुखावत आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक - दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता अध्यक्ष गांधी कुटुंबातील होणार की बाहेरचा याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हेही वाचा - ‘महाविकास आघाडी सरकारचं वाईन विक्रीचं धोरण उत्तम होतं’, शरद पवारांचं मोठं विधान दिग्गज नेता गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर, काँग्रेस आणि त्यांच्या पुढील अध्यक्षांच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होत असताना पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) रविवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या नूतन अध्यक्ष आणि पक्षाच्या पुढील अध्यक्षांच्या निवडीच्या तारखांबाबत चर्चा करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.