नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : 'कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर 72 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे नरेंद्र मोदी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने गेल्या 6 फेब्रुवारीला देशभर चक्काजाम आंदोलन केले होते. आता काँग्रेस पक्षाचा वतीने येत्या 9 फेब्रुवारी रोजी संसद घेरावचं आवाहन करण्यात आलं आहे,' अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की, देशाचा अन्नदाता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. परंतु केंद्रातील भाजपाचे हुकूमशाही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत. त्यामुळेच ते रद्द करावेत, ही मागणी लावून धरत महाराष्ट्रासह देशभर आंदोलन करुन काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला आहे. कृषी कायदे मंजूर करवून घेताना संसदेत चर्चा केली नाही. विरोध तीव्र होत असताना आता मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचं केवळ नाटक करत आहे. संसद घेराव आंदोलनासाठी काँग्रेसने मोठी तयारी केली असून दिल्ली काँग्रेससह देशभरातील कार्यकर्त्यांना संसद घेरावमध्ये सहभााागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा - अमित शहांनी शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर संजय राऊतांचं मोठं विधान
'मोदी सरकारमुळे भारताची नाचक्की'
शेतकरी आंदोलनावर योग्य वेळी मार्ग न काढल्याचा आरोप करत काँग्रेसने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 'दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभऱ नाचक्की होत आहे,त्याचमुळे आता संसद घेराव करण्यात येणार आहे,' असं काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Farmer, Narendra modi