नवी दिल्ली, 14 जुलै : भारत आणि चीन (India and China) यांच्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (Actual Line of Control) सुरू असलेला वाद शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. चीननं आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या असून आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात चीननं पक्कं बांधकाम (Concrete buildings) सुरू केल्याचं समोर आलं आहे. भारत-चीन सीमेवरील चीनकडील बाजूला हे बांधकाम करण्यात येत असून त्यामुळे भारताच्या सुरक्षेला (Security) मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडतंय?
भारत-चीन सीमारेषेवरील अरुणाचल प्रदेशच्या पुढे सुरू होणाऱ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागात चीननं काँक्रिटची बांधकामं सुरू केली आहेत. यापूर्वी ज्या परिसरात भारत आणि चिनी सैन्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली होती, त्या ठिकाणापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर हे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आहे. कुठल्याही वेळी काही मिनिटांत भारताच्या हद्दीत प्रवेश करता यावा, या उद्देशानं चीननं तयारी सुरू केल्याचं सांगितलं आहे.
चीनची दुटप्पी भूमिका
एकीकके चीननं कमांडर पातळीवरच्या चर्चा सुरू करण्याला संमती दिली असून दुसरीकडे आपल्या कुरापती मात्र सुरुच ठेवल्या आहेत. विस्तारवादी धोरणाची टीका चीनवर वारंवार होत असते. त्याचीच प्रचिती सध्याच्या घटनांमधून येत असल्याचं दिसत आहे. सिक्कीम भागातील नाकू ला या परिसरात चीननं काही बांधकाम केलं असून हा परिसर भारतीय हद्दीपासून काही किलोमीटर अंतरावर आहे.
हे वाचा -Sputnik V लसीसाठी महाराष्ट्रातील लोकांनीही गाठलं गुजरात; भलीमोठी वेटिंग लिस्ट
रस्त्यांचं बांधकाम
चीननं त्यांच्या भूभागातून अगदी नाकू ला परिसरापर्यंत येणारा रस्ता बांधला आहे. यामुळे चीनचा भारतात पोहोचण्याचा वेग वाढणार आहे. आणीबाणीच्या किंवा निर्णायक परिस्थितीत वेगाने भारताकडं चालून येता यावं, हाच यामागचा उद्देश असल्याचं संरक्षण तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. नुकतंच शांघाय कॉर्पोरेशनच्या बैठकीत भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला इशारा दिला होता. शांतता प्रक्रिया एकतर्फी होणार नसल्याचं त्यांनी ठणकावलं होतं. त्यानंतर चीननं कमांडर लेव्हलच्या चर्चेची तयारी दाखवली होती. मात्र याला काही तास उलटायच्या आतच चीनच्या या नव्या कुरापती समोर आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china, Security