श्रीहरीकोटा, 14 जुलै : अवघ्या जगाचं लक्ष लागून असलेल्या भारताच्या ऐतिहासिक चांद्रयान मोहिमेनं पहिला टप्पा यशस्वी पार केला आहे. इस्त्रोच्या महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. यशस्वीपणे चांद्रयान हे अंतराळात स्थिरावलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं. गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान - 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे. चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस. लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.
#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO) launches #Chandrayaan-3 Moon mission from Satish Dhawan Space Centre in Sriharikota.
— ANI (@ANI) July 14, 2023
Chandrayaan-3 is equipped with a lander, a rover and a propulsion module. pic.twitter.com/KwqzTLglnK
चांद्रयान-3 च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाहीत. या वेळी त्यासोबत स्वदेशी प्रोपल्शन मॉड्युल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. त्याचे वजन 2145.01 किलोग्रॅम असेल, त्यापैकी 1696.39 किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्युलचं वास्तविक वजन 448.62 किलो आहे. (Chandrayaan-3 : असं झेपावलं चांद्रयान-3, ऐतिहासिक क्षणांचे Photo पाहिलात का?) इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -3 चं प्रमुख उद्दिष्ट आहे. यासोबतच भारताच्या या मोहिमेमुळे चंद्र मोहिमांसाठी आवश्यक असलेलं नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठीही मदत होईल. चांद्रयान -3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल.