नवी दिल्ली 19 ऑगस्ट : सीबीआयने दिल्लीमध्ये 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह 20 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांवरही छापेमारी करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांनी स्वतः ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. मी सीबीआयचं स्वागत करतो. चौकशीत पूर्ण सहयोग करेल, जेणेकरून सत्य लवकरच बाहेर येईल, असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. मनीष सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे, की आतापर्यंत अनेकदा माझ्यावर केस केल्या गेल्या, मात्र काहीच समोर आलं नाही. यावेळीही असंच होणार. देशातील चांगल्या शिक्षणासाठीचं माझं काम थांबवलं जाऊ शकत नाही. आम्ही लाखो मुलांचं भविष्य बनवत आहोत. मात्र, हे अतिशय दुर्दैवी आहे, की आपल्या देशात जो चांगलं काम करतो, त्यालाच त्रास दिला जातो. याच कारणामुळे आपला देश कधी नंबर 1 बनू शकला नाही, असं त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांचं हे ट्विट रिट्विट करत लिहिलं, की ज्या दिवशी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलचं कौतुक झालं आणि मनीष सिसोदियांचा फोटो अमेरिकेतील सर्वात मोठं वृत्तपत्र NYT च्या पहिल्या पानावर छापला गेला, त्याच दिवशी त्यांच्या घराच्या केंद्राने सीबीआयला पाठवलं. CBI चं स्वागत आहे. पूर्ण सहकार्य केलं जाईल. यापूर्वीही अनेक तपासणी/छापे झाले आहेत. काही बाहेर आलं नाही. यावेळीही काहीही बाहेर येणार नाही केजरीवाल पुढे म्हणाले, संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलची चर्चा करत आहे, हेच त्यांना थांबवायचे आहे. म्हणूनच दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांवर छापे टाकले जात आहेत. 75 वर्षात ज्याने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला त्याला रोखलं गेलं. त्यामुळे भारत मागे राहिला. आता दिल्लीतील चांगली कामं थांबू देणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.