जम्मू काश्मीर, 25 ऑगस्ट : जम्मू काश्मीरजवळ घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय सैन्यांने चोख उत्तर दिलं आहे. 4-5 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. यात एकाला अटक करण्यात आली आहे. पकडलेल्या दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ 30 हजारांसाठी हा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती त्याने दिली आहे. पकडलेल्या दहशतवाद्याने कबूल केले आहे की, त्याला पाकिस्तानी लष्कराच्या एका कर्नलने 30 हजार रुपये देऊन भारतातील लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्यासाठी पाठवले होते.
21 ऑगस्ट रोजी पहाटे जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना मिळाली. काही दहशतवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत होते. यावर जवानांनी तत्परता दाखवत तत्काळ कारवाई केली. तीन पैकी दोन दहशतवाद्यांचा लँडमाईन स्फोटात खात्मा झाला तर एक दहशतवादी भारतीय चौकीजवळ आला होता. मात्र भारतीय सैनिकांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तबरक हुसेन असे या पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे.
#WATCH | Tabarak Hussain, a fidayeen suicide attacker from PoK, captured by the Indian Army on 21 August at LOC in Jhangar sector of Naushera, Rajouri, says he was tasked by Pakistan Army's Col. Yunus to attack the Indian Army for around Rs 30,000 pic.twitter.com/UWsz5tdh2L
— ANI (@ANI) August 24, 2022
दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर कोटली जिल्ह्यातील सबजाकोट गावचा रहिवासी आहे. लष्कराच्या चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. भारतीय चौकीवर हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याचे त्याने सांगितले.
दहशतवाद्याने सांगितले की, त्याला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या कर्नल युनूस चौधरीने भारतावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. यासाठी कर्नलने त्याला 30 हजार पाकिस्तानी रुपये दिले. या दहशतवाद्यांना 21 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी कर्नल चौधरी याने भारतीय चौक्यांवर हल्ला करण्याचे काम दिले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian army, Pakistan, Terrorist