मुथूट फायनान्स उभं करणाऱ्या उद्योजकाचा अपघातात मृत्यू; पाय घसरल्याचं निमित्त

मुथूट फायनान्स उभं करणाऱ्या उद्योजकाचा अपघातात मृत्यू; पाय घसरल्याचं निमित्त

गोल्ड फायनान्स अर्थात सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज देणारी भारतातली सर्वांत मोठी कंपनी असलेल्या मुथूट ग्रुपच्या अध्यक्षांचं दिल्लीत नुकतंच अपघाती निधन झालं. कोण होते हे मुथुट? नेमकं काय झालं?

  • Share this:

दिल्ली, 9 मार्च: गोल्ड फायनान्स (Gold Finance)अर्थात सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज देणारी भारतातली सर्वांत मोठी कंपनी असलेल्या मुथूट ग्रुपचे (Muthoot Group) अध्यक्ष एम. जी. जॉर्ज मुथूट (MG George Muthoot) यांचं नवी दिल्लीत शुक्रवारी (5 मार्च) अपघाती निधन झालं. दिल्लीतल्या कैलाश भागातल्या एका इमारतीत चौथ्या मजल्यावर ते राहत होते. तिथून तोल गेल्यामुळे 72 वर्षांचे मुथूट खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं. ते पडल्याची माहिती देणारा फोन शुक्रवारी रात्री 9.21 वाजता अमर कॉलनी पोलिस स्टेशनला आल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक (आग्नेय) आर. पी. मीना यांनी दिली. त्यांना तातडीने फोर्टिस एस्कॉर्टस् हॉस्पिटलला नेण्यात आलं; मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

मुथूट यांच्या कार्याची ओळख करून देणारं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

मुथूट ग्रुपमधली मुथूट फायनान्स लिमिटेड (Muthoot Finance Ltd.) ही कंपनी उभी करण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. त्या कंपनीचं भांडवली मूल्य 51 हजार कोटी रुपये असून, कंपनीचं एकूण उत्पन्न 8722 कोटी रुपये आहे.

जॉर्ज मुथूट कोण होते?

केरळच्या (Kerala) सध्याच्या पठाणमथिटा जिल्ह्यात कोझेन्चेरी इथं 1949 साली त्यांचा जन्म झाला. एम. जी. जॉर्ज मुथूट अर्थात मथाई जॉर्ज जॉर्ज मुथूट असं त्यांचं नाव. मुथूट ग्रुपची स्थापना मुथूट निनान मथाई यांनी केली. एम. जी. जॉर्ज मुथूट हे त्यांचे नातू. एम. जॉर्ज मुथूट यांनी ग्रुपमधल्या फायनान्स बिझनेसची मुहूर्तमेढ रोवली. ते एम. जी. जॉर्ज मुथूट यांचे वडील.

मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर लगेचच एम. जी. जॉर्ज मुथूट यांनी आपल्या कौटुंबिक व्यवसायात रुजू होण्याचा निर्णय घेतला. ऑफिस असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात केलेले एम. जी. 1979मध्ये व्यवस्थापकीय संचालक झाले. 1993मध्ये त्यांनी मुथूट ग्रुपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

तत्पूर्वी 1980च्या दशकात त्यांच्या कुटुंबात फूट पडली आणि मुथूट उद्योगाचं साम्राज्य दोन भागांत विभागलं गेलं. त्यातून तयार झालेला मुथूट पाप्पाचान ग्रुप आजच्या घडीला मुथूट फायनान्स कंपनीचा केरळमधला प्रतिस्पर्धी आहे.

मुथूट फायनान्स कंपनीचं मुख्यालय केरळमध्ये कोची (Kochi) शहरात आहे. एम. जी. जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली त्या उद्योगाने मुख्यालयाबाहेर आपले हात-पाय विस्तारले आणि एके दिवशी देशातली सर्वांत मोठी गोल्ड कंपनी बनण्याचा मान मिळवला. देशभरात या कंपनीच्या 5550 शाखा असून, 2020च्या आकडेवारीनुसार, वार्षिक आर्थिक उत्पन्न 1.3 अब्ज डॉलर एवढं होतं. डिसेंबर 2020मध्ये संपलेल्या तिमाहीत मुथूट कंपनीने 56 हजार कोटी रुपयांची 2020मध्ये फोर्ब्ज एशिया मॅगझिनने (Forbes Asia) एम. जी. जॉर्ज मुथूट हे भारतातील 26 व्या क्रमांकाचे श्रीमंत, तसंच सर्वांत श्रीमंत मल्याळी व्यक्ती असल्याचं जाहीर केलं होतं.

केरळमधल्या शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चचेही ते ट्रस्टी होते. त्यांच्या पश्चात पत्नी सारा आणि जॉर्ज एम. जॉर्ज, तसंच अलेक्झांडर एम. जॉर्ज हे दोन मुलगे असा परिवार आहे.

त्यांच्या सर्वांत धाकटा मुलगा पॉल एम. जॉर्ज याचं 22 ऑगस्ट 2009 रोजी रस्ता अपघातात निधन झालं. निधनावेळी तो 32 वर्षांचा होता आणि एनबीएफसीचा कार्यकारी संचालक होता.

(हे पाहा:  Explained: म्युचअल फंड KYC अपडेट करायचं आहे? अशी आहे प्रक्रिया )

'एम. जी. जॉर्ज मुथूट यांचा अचानक आणि अनपेक्षित झालेला मृत्यू म्हणजे कुटुंबीय, मित्रमंडळी, कंपनी, कर्मचारी आणि सर्व संबंधितांचं कधीही भरून न येणारं नुकसान आहे. कंपनीचे सर्व संचालक आणि कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांकडे तीव्र सहवेदना व्यक्त करत आहेत,' असं मुथूट फायनान्स कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मृत्यूमागे दुसरं काही कारण असल्याची शक्यता सध्या तरी वाटत नाही. या प्रकरणी तपास सुरू असून, त्यांच्या कुटुंबीयांचे, तसंच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत. त्यांच्या घराजवळच्या सीसीटीव्हींचं फूटेजही तपासलं जात आहे. काही पोलिस सूत्रांनी दिलेल्या नुसार, ही दुर्दैवी घटना घडली, तेव्हा जॉर्ज एकटेच घरी होते आणि ते चौथ्या मजल्यावर उभे असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.

First published: March 9, 2021, 7:30 AM IST
Tags: gold

ताज्या बातम्या