एसजीपीसीच्या नेत्या जागीर कौर यांनी सांगितलं की, जून 1984 मध्ये लष्करी कारवाईत श्री हरमंदिर साहिबमध्ये श्री गुरु ग्रंथसाहिबच्या पवित्र स्वरूपाला गोळी लागली होती. एसजीपीसीच्या कार्यकारिणीने आता श्री गुरु ग्रंथसाहिबच्या या प्रतीचं दर्शन लोकांना घडवण्याचा निर्णय घेतला आहे.
SGPC चे हरजिंदर सिंह धामी यांनी सांगितलं की, 1984 मध्ये ऑपरेशन दरम्यान नुकसान झालेल्या गुरु ग्रंथ साहिबचं पवित्र स्वरूप श्री अकाल तख्तजवळील गुरुद्वारा शहीद बाबा गुरबक्ष सिंहमध्ये ठेवण्यात आलं होतं. 2 जून ते 5 जून या कालावधीत शीख मंडळींना ते पाहता येणार आहे. 1984 नंतर गेल्या वर्षी प्रथमच ते दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
Operation Blue Star हे देशाच्या इतिहासात लष्कराने राबवलेलं सर्वात मोठं आणि रक्तरंजित देशांतर्गत मिशन होतं. याअंतर्गत 1984 मध्ये 1 जून ते 8 जून या कालावधीत अमृतसरचं सुवर्ण मंदिर अतिरेक्यांपासून मुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गुरुद्वाराच्या आत असलेल्या हरमंदिर साहिबमधून शीख दहशतवाद्यांना हटवण्याचे आदेश दिले होते.
जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी पंजाबमध्ये स्वतंत्र राष्ट्र खलिस्तानची मागणी करत सुवर्ण मंदिर परिसर व्यापला होता. लष्कराने भिंद्रनवाले आणि त्याच्या काही साथीदारांना तेथून हटवण्यासाठी ऑपरेशन सुरू केलं, ज्याला ऑपरेशन ब्लूस्टार असं नाव देण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये सैन्याला मशीन गन, हलक्या तोफा, रॉकेट आणि अगदी रणगाडेही वापरावे लागले.
या कारवाईमुळे शीखांचं सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ अकाल तख्तचेही नुकसान झालं. या संपूर्ण मोहिमेत 492 लोक आणि 83 सैनिक मारले गेले. सुवर्ण मंदिरावर जोरदार गोळीबार केल्यानंतर आणि अनेक दिवसांच्या लढाईनंतर अखेरीस भिंद्रनवालेला मारण्यात लष्कराला यश आलं. भारतीय लष्कराने 7 जून रोजी सुवर्ण मंदिर ताब्यात घेतलं.
या कारवाईमुळे शीखांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. शीखांमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींविरोधात संतापाची लाट उसळली. याच पार्श्वभूमीवर चार महिन्यांनंतर 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यांच्या दोन शीख सुरक्षा रक्षकांनीच ही घटना घडवून आणली.
6 जून रोजी, ऑपरेशन ब्लूस्टारच्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त, पंजाबच्या पंथिक गटांनी अनेक कार्यक्रम जाहीर केले आहेत. या अंतर्गत 4 जून रोजी अमृतसर येथील गुरु नानक भवन सभागृहात मोठ्या पंथ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 5 जून रोजी अमृतसरमध्ये 'आझादी मार्च' काढण्यात येणार असून, 6 जून रोजी अमृतसर बंदची हाक देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. शहराचं छावणीत रुपांतर झालं आहे. पंजाब पोलिसांव्यतिरिक्त सीआरपीएफ आणि रॅपिड अॅक्शन फोर्सही तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय बीएसएफचे सुमारे 2 हजार जवानही 6 जूनपर्यंत अमृतसरमध्ये तैनात असतील.