लखनऊ 09 मे : कोरोनाकाळात (Corona Pandemic) कोरोना रुग्ण आणि त्यांच्यासाठी केलेल्या व्यवस्था पाहाण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) मुरादाबाद आणि बरेली दौऱ्यावर होते. बरेलीमध्ये योगी यांनी भाजप नेत्यांसोबत बातचीतही केली. यावेळी केंद्रीय मंत्री आणि बरेलीचे खासदार संतोष गंगवार, आंवलाचे खासदार यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सरकारी उपाययोजनांची पोलखोल केली. रविवारी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं एक पत्र व्हायरल (Letter Viral) होताच एकच गोंधळ उडाला. खासदार संतोष यांनी शनिवारीच मुख्यमंत्र्यांना हे पत्र दिलं होतं. या पत्रात केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी कोरोनाबाधित रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रचंड अव्यवस्था असल्याची आणि अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार केली आहे. ते म्हणाले, की रेफर केल्यानंतर रुग्ण सरकारी रुग्णालयात गेले तरीही त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयातील रेफर करुन आणण्यासाठी सांगितलं जात आहे. या काळात रुग्णाची प्रकृती आणखीच गंभीर होते. हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये बाधित रुग्णांना लवकरात लवकर दाखल करुन घेत उपचार करणं अधिक गरजेचं आहे. केंद्रीय मंत्र्यांनी रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची चढ्या दरानं विक्री केली जात असल्याची तक्रार करत सरकारनं याचे दर निर्धारित करावेत, अशी मागणी केली आहे. बरेलीमधील आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांनी फोन उचलले नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. यामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. गंगवार म्हणाले, की बरेलीमध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. याच एक कारण हेदेखील आहे, की काही लोकांनी विनाकारण ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आपल्या घरांमध्ये ठेवले आहेत. तसंच ते याची चढ्या दरानं विक्रीही करत आहेत. प्रशासनानं अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जेणेकरून गरजूंना हे सिलेंडर मिळू शकतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.