नवी दिल्ली 15 फेब्रुवारी : स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित कथित ‘टूलकिट’ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याबद्दल बंगळुरुतील दिशा रवी (Disha Ravi) या २२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. ती टूलकिट प्रकरणातील प्रमुख कारस्थानी असल्याचे पोलिसांनी सांगितलं. आता भाजपचे वरिष्ठ नेता आणि बंगळुरू सेंट्रलचे खासदार पीसी मोहन यांनी दिशा रवीची तुलना थेट 26/11च्या हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल आमिर कसाबसोबत(Ajmal Kasab) केली आहे. पीसी मोहन यांनी ट्वीटरवर लिहिलं, की बुरहान वानीदेखील 21 वर्षाचा होता. अजमल कसाबही 21 वर्षाचा होता. वय केवळ एक संख्या आहे. कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही. कायद्याला आपलं काम करू द्या. एक गुन्हा नेहमी गुन्हाच असतो. आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी #DishaRavi असं लिहिलं आहे आणि दिशा रविचा एक फोटोही ट्वीट केला आहे. मोहन म्हणाले, की जे लोक दिशा रवीचा बचाव करत आहेत, त्यांनी दिल्ली पोलिसांचा जबाब वाचायला हवा. पीसी मोहन यांनी दिल्ली पोलिसांचं ट्वीटही शेअर केलं आहे, ज्यात लिहिलं गेलं आहे, की दिशा रवी त्या टूलकीटची एडिटर आहे. ती हे टूलकीट तयार करण्यात आणि सोशल मीडियावर त्याचा प्रसार करण्याचा कट रचणाऱ्यातील एक मुख्य आहे. तिनचं या टूलकीटचं शेवटचं ड्राफ्ट बनवणाऱ्या टीमसोबत काम केलं होतं, जेणेकरून भारताविरोधात द्वेष पसरवला जावा. दिशानंच ग्रेटा थनबर्गसोबत हे टूलकीट शेअर केलं होतं.
Burhan Wani was a 21-year-old.
— P C Mohan (@PCMohanMP) February 14, 2021
Ajmal Kasab was a 21-year-old.
Age is just a number!
No one is above the law.
Law will take its own course.
A Crime is a crime is a crime is a crime.#DishaRavi pic.twitter.com/m6eRwAnMuf
भाजपचे खासदार पीसी मोहन हे परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीचे सदस्यही आहेत. त्यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर शेअर केले जात आहे.त्यांच्यानंतर पक्षाच्या प्रवक्ता नुपूर शर्मा यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं, की कोणत्याही अपराधाचा लिंग किंवा वयाशी काही संबंध असतो का? माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील महिलाही 17 आणि 24 वर्षांच्या होत्या. निर्भयावर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्यातला एक आरोपीही 17 वर्षांचा होता. रविवारी दिल्ली पोलिसांनी 22 वर्षीय पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवि हिला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवलं आहे. शनिवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं टूलकीट प्रकरणी दिशाला बंगळुरूमधून ताब्यात घेतलं. दिशानं बंगळुरुच्या एका खासगी महाविद्यालयातून बीबीएची पदवी घेतली आहे आणि ती पर्यावरणासाठी काम करणाऱ्या फ्राइडेज फॉर फ्यूचर संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.