लखनऊ 28 मे: कोरोनासंदर्भातील (Coronavirus) आपल्या विधानांमुळे रामदेव बाबा मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. अशात आता भाजपच्या एका आमदारानंही (BJP MLA) डॉक्टरांबाबत (Doctors) वादग्रस्त विधान केलं आहे. अॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करत असल्याचं या आमदारानं म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह (Surendra Singh) यांनी हे वक्तव्य केलं आहे. अनेकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारे सुरेंद्र सिंह डॉक्टरांबाबतच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुरेंद्र सिंह म्हणाले, की अॅलोपॅथी उपचारपद्धतीमध्ये १० रुपयांची एक गोळी १०० रुपयांना विकली जाते. हे लोक समाजहिताचं काम करणारे नाहीत. याच गोष्टीचा हवाला देत सुरेंद्र सिंह यांनी डॉक्टरांना राक्षस म्हटलं आहे.
सुरेंद्र सिंह म्हणाले, की रुग्णांच्या मृत्यूनंतरही अॅलोपॅथी डॉक्टर त्यांना आयसीयूमध्येच ठेवतात आणि कुटुंबीयांकडून पैसे उकळतात. त्यामुळे, लोकांनी आता आयुर्वेदीक उपचार पद्धती आणि योगा हे मार्ग स्वीकारायला हवेत. आयुर्वेदीक आणि अॅलोपॅथी या दोन्ही उपचार पद्धती सारख्याच असल्याचं मतही सुरेंद्र सिंह यांनी व्यक्त केलं. सोबतच त्यांनी बाब रामदेव यांच्या विधानाचंही समर्थन केलं. ते म्हणाले, की रामदेव बाबांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सदृढ आणि सशक्त भारत मोहीम सुरू केली आहे. हे काम अत्यंत कौतुकास्पद असून आपण मनापासून रामदेव बाबा यांचं अभिनंदन करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सुरेंद्र सिंह म्हणाले, की काही अॅलोपॅथी डॉक्टर रुग्णांची काळजी घेत अगदी मनापासून काम करत आहेत. मात्र, काही डॉक्टर अत्यंत भ्रष्ट आहेत आणि त्यांचा मी विरोध करतो. सुरेंद्र सिंह याआधीही आपल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी असा दावा केला होता, की आपण नियमित गोमूत्र पित असल्यानं इतक्या लोकांमध्ये वावरत असतानाही आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. इतकंच नाही गोमूत्र पितानाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गोमूत्र प्यायल्याचे आरोग्यासाठी असणारे अनेक फायदे ते या व्हि़डिओमध्ये समजावून सांगत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baba ramdev, BJP, Doctor contribution, The controversial statement