भोपाळ, 18 जून : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh News) इंदूरमध्ये 2020 दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) अंतर्गत अटकेनंतर तुरुंगात गेलेल्या एका हिस्ट्रीशीटरच्या पत्नीला भाजप कडून नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी तिकीट देण्यात आलं होतं. मात्र 24 तासांच्या आत शनिवारी हे तिकीट परत घेण्यात आलं. यानंतर पुन्हा एकदा यावर चर्चा सुरू झाली आहे. तिकीट दिल्यानंतरही भाजपवर अनेक आरोप केले जात होते. त्याशिवाय तिकीट परत घेतल्यानंतरही अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. भाजप प्रदेशच्या एक वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्या कारणाने शून्य सहनशीलता नीती अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हेगार युवराज उस्ताद याची पत्नी स्वाती काशिद हिला शुक्रवारी नगरसेवकाच्या उमेदवार पदाचं तिकीट दिलं होतं. इंदूरच्या वॉर्ड क्रमांक 56 मधून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र यानंतर अवघ्या 24 तासात त्यांनी हे तिकीट परत घेतलं आणि गजानंद गावडे यांना आपला उमेदवार घोषित केला. स्वाती काशिद या मूळच्या जालना (महाराष्ट्र) जिल्ह्यातील असून त्यांचं माहेरचं नाव तांगडे आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष विष्णुप्रसाद शर्मा यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री आणि पक्षाला स्वातीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचं लक्षात येताच त्यांनी शून्य सहनशीलता नीतीअंतर्गत त्यांचं तिकीट रद्द केलं. पोलीस अधिकाऱ्यांनीही सांगितलं की, काशिद यांचे पती युवराज काशिदवर गेल्या काही वर्षांत हत्या आणि अनेक आरोपांबाबत गुन्हे दाखल आहेत. युवराज उस्ताद म्हणून कुख्यात असलेल्या युवराज काशिदला 2020 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील मागील काँग्रेस सरकारने अटक करून तुरुंगात टाकले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.