नवी दिल्ली, 24 डिसेंबर : कोरोना व्हायरसमुळे लोकांना अनेक महिने लॉकडाउनमध्ये राहावं लागलं. बाहेर जाउन खाणं तर बंद झालं. परंतु लॉकडाउनमध्ये एक मजेशीर बाब समोर आली आहे. लॉकडाउनमध्ये भारतीयांनी सर्वात जास्त बिर्यानी खाल्याचं समोर आलं आहे. घरी बनवण्यासह, ऑनलाईन ऑर्डरही करण्यात आली. लॉकडाउन काळात बिर्यानी सर्वाधिक आवडीचा पदार्थ ठरला. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगीच्या एका रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे.
ऑनलाईन पदार्थ ऑर्डर करणारी अॅप आधारित कंपनी स्विगीच्या आकडेवारीनुसार, या कठिण काळातही 2020 मध्ये लोकांचं बिर्यानी प्रति असलेलं प्रेम कमी झालेलं नाही. रिपोर्टनुसार, लॉकडाउनमध्ये या पदार्थाप्रति लोकांची आवड इतकी होती की, प्रत्येक सेकंदाला एकाहून अधिक बिर्यानीच्या ऑर्डर मिळाल्या.
बेंगळुरूतील एका कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चिकन बिर्यानीने भारतातील सर्वात आवडीचा पदार्थ म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तीन लाख नव्या युजर्सनी स्विगीवर पहिल्यांदा चिकन बिर्यानीच ऑर्डर केली आहे. तर व्हेज बिर्यानीला इतकी पसंती नसल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रत्येक एक व्हेज बिर्यानीच्या ऑर्डरवर, सहा चिकन बिर्यानीच्या ऑर्डर होतात.
चिकन बिर्यानीनंतर मसाला डोसा भारतीयांचा दुसरा सर्वाधिक आवडता पदार्थ ठरला आहे.
रिपोर्टनुसार, 2020 मध्ये भारतीयांना सर्वाधिक पाणीपुरीची कमी जाणवल्याचं समोर आलं आहे. स्विगीने लॉकडाउननंतर पाणीपुरीच्या दोन लाखांहून अधिक ऑर्डर्सचा सप्लाय केला आहे. एवढंच नाही, तर भोपाळ आणि बेंगळुरूतील दोन ग्राहकांनी ऑर्डर पोहचवणाऱ्याला पाच-पाच हजार रुपयांची टीप दिली.
या पदार्थांनाही मागणी -
या वर्षात भारतीयांकडून पाच पदार्थांना चांगलीच मागणी होती. बिर्यानी आणि मसाला डोसासह पनीर बटर मसाला, चिकन फ्राईड राईस, गार्लिक ब्रेडस्टिक्ट्सला मागणी होती. तसंच कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये कॅपेचिनो, फ्लेवर्ड चहा आणि स्ट्रिट फूडच्या मागणीत वाढ झाली. रिपोर्टनुसार, वर्क फ्रॉम होम करताना अनेक लोकांनी स्विगीकडे वेगवेगळ्या प्रकारचे चहा आणि कॉफी ऑर्डर केल्या आहेत.