बिलासपूर, 8 जुलै : छत्तीगढच्या बिलासपूर येथील एका कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोक विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. कोणी या अपघाताला खराब रस्ता कारणीभूत असल्याचं म्हणतंय तर कोणी ड्रायव्हरला दोषी ठरवतंय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक 7 सीटर हुंडाई गाडी रस्त्यावर पूर्णपणे पलटी झाल्याचे तुम्ही पाहू शकता. यात गाडीची चारही चाक वर आहेत. गाडीची अवस्था पाहून अपघात किती भयंकर झाला असेल याची कल्पना करता येऊ शकते. अपघाताची चौकशी करता हा अपघात बिलासपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील मंगला चौकात झाला असल्याची माहिती मिळाली. येथे बांधकामाचे साहित्य असेच रस्त्यावर टाकले होते. रात्री ही कार या बांधकाम साहित्याला धडकून पलटी झाली. बांधकाम साहित्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात गाडी पूर्णपणे रस्त्यावर पलटी झाली होती. लोकांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करून बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला यासाठी जबाबदार धरले.
एका नेटकाऱ्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “बांधकामाचे साहित्य महामंडळाने रस्त्याच्या मधोमध टाकले होते, त्यामुळे हा अपघात झाला. त्याचबरोबर शहरातील इतरही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे, त्यामुळे इतर ठिकाणी देखील असे अपघात घडू शकतात. तेव्हा प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष द्यावे”.