मधुबनी, 06 मार्च: जिथं काही लोक मुलींना ओझं मानतात, तिथं बदलत्या काळानुसार मुलींचा सन्मान करणारेही लोक समाजात आहेत. ‘आम्ही कुठेही कमी नाही’, असं म्हणत मुलींनी गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. उद्योग, संरक्षण, वैद्यक, आर्थिक, आभियांत्रिकी आदी क्षेत्रात अनेक मुली स्वकर्तृत्वावर अव्वल स्थानी पोहोचल्या आहेत. एकीकडं असं चित्र असताना, दुसरीकडं जन्मतःच मुलींना नाकारण्याची मानसिकताही दिसून येते. मुलगी म्हणजे ‘जबाबदारीचं ओझं’ अशी चुकीची संकल्पनाही अनेकांच्या मनात असल्याचं दिसतं. या सर्व पार्श्वभूमीवर बिहारमधल्या (Bihar News) झा कुटुंबानं आपल्या मुलीसाठी घेतलेला निर्णय खऱ्या अर्थानं अनोखा म्हणावा लागेल. यातून त्यांनी मुलीच्या जन्माचा आनंद द्विगुणित तर केलाच पण मुलींना नाकारणाऱ्या पालकांना एक संदेशही दिला आहे. झा कुटुंबाच्या या अनोख्या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हे वाचा- शहराची स्टेअरिंग आता सहावी पास रिक्षाचालकाच्या हाती, ‘या’ शहराचा बनणार महापौर बिहारमधल्या मधुबनी (Madhubani, Bihar) जिल्ह्यातल्या एका डॉक्टर दांपत्यानं आपल्या मुलीचा जन्म संस्मरणीय ठरावा आणि मुलींविषयी समाजात सकारात्मक संदेश पोहोचावा यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या कुटुंबाने आपल्या मुलीला तिच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त एक अनोखी भेट दिली आहे. इंझारपूर येथील आरएस बाजार परिसरात राहणाऱ्या डॉ. सुरविन्दु झा (Dr. Survindu Jha) आणि डॉ. सुधा झा (Dr. Sudha Jha) या दांपत्याने त्यांची मुलगी आस्था भारद्वाजच्या नावावर चक्क चंद्रावर एक एकर जमीन (Land on moon) विकत घेतली असून, या जमिनीची नोंदणीही केली आहे. डॉ. सुरविन्दू झा झंझारपूरमध्ये खाजगी नर्सिंग होम चालवतात. आस्था भारद्वाज ही आमच्या कुटुंबातील पहिली मुलगी असल्याचं डॉ. झा यांनी सांगितलं.
‘मुलगी ही कुटुंबाचा मान आणि सन्मान असते. आमच्या कुटुंबात जवळपास सात पिढ्यांपासून मुलींचा आवाज आणि हसणं कुणी ऐकलं नव्हतं. आता आस्थाच्या जन्मामुळे आमचं कुटुंब खूप आनंदी आहे. त्यामुळे हा आनंद खास बनवण्यासाठी आणि द्विगुणित करण्यासाठी आम्ही चंद्रावर जमीन खरेदी करुन ती आमच्या मुलीला भेट दिली आहे,’ असं डॉ. झा यांनी सांगितलं. हे वाचा- मेडिकल शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रांनी दिली Good News ‘मुलीसाठी चंद्रावर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता सुमारे दीड वर्ष लागलं. मी सर्वप्रथम यूएसएमधल्या (USA) कॅलिफोर्नियातील लुना सोसायटीच्या वेबसाईटवर अर्ज केला. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. जमिनीची किंमत आणि नोंदणी शुल्काची रक्कम पेपल अॅपद्वारे (Paypal App) भरल्यानंतर, 27 जानेवारी 2022 रोजी स्पीड पोस्टद्वारे आम्हाला चंद्रावरील जमीन नोंदणीचा पेपर मिळाला, असं डॉ. झा यांनी सांगितलं.