नवी दिल्ली 22 मे : भाजपनं (BJP) 2020 मधील बिहार विधानसभा निवडणुकांसाठी (Bihar Assembly Elections) आपल्या मुख्यालयाच्या खात्यातील जवळपास 26.7 कोटी रुपये खर्च केले आहेत. यात जे पी नड्डा, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या स्टार प्रचारकांच्या (Star Campaigners) प्रवासासाठी चार्टर्ड विमानांवर 24.07 कोटी रुपये खर्च केला गेला आहे. निवडणूक आयोगाकडे भाजपने खर्चासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाच्या बिहार विभागाने निवडणुकीत एकूण 28 कोटी रुपये खर्च केले, तर उमेदवारांना आर्थिक मदत म्हणून 16.5 कोटी खर्च केले. यानुसार पक्षाकडून सर्व उमेदवारांना 15-15 लाख रुपये देण्यात आले. निवडणुकीच्या घोषणेपासून निकालापर्यंत पक्षाच्या मुख्यालयातून आणि राज्याच्या युनिटकडून 71.73 कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पक्षाचं केंद्रीय मुख्यालय आणि राज्य युनिटच्या खात्यात एकूण प्रारंभिक ठेवीची रक्कम 2376.90 कोटी रुपये होती आणि निवडणुकीनंतर उर्वरित ठेव 2279.96 कोटी होती. पक्षानं या संपूर्ण खर्चाचा तपशील मार्च महिन्यात सादर केला होता. तो आयोगाने शुक्रवारी सार्वजनिक केला. सुशील कुमार मोदी, देवेंद्र फडणवीस आणि शाहनवाज हुसेन या स्टार प्रचारकांसाठी विमानाच्या आणि टॅक्सीच्या खर्चासाठी भाजपाच्या राज्य शाखेने दीड कोटी रुपये खर्च केले. तर, इतर नेत्यांच्या ट्रेन आणि टॅक्सीच्या प्रवासालाठी 45.6 लाख रुपये खर्च केले. बिहार युनिटनं मीडियाच्या माध्यमातून जाहिरातीसाठी तब्बल 16 कोटी रुपये खर्च केले. यात गूगल इंडियाला देण्यात आलेले 1.59 कोटीही सामील आहे. आयोगाने ठरवलेल्या मर्यादेनुसार बिहारसारख्या राज्यात विधानसभा निवडणुकीत एक उमेदवार 30.8 लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतो. तर, कोणत्याही राजकीय पक्षाने केलेल्या खर्चास मर्यादा नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.