भोपाळ, 26 डिसेंबर : कॅन्सरसारखं गंभीर दुखणं शारीरिक हानी तर करतातच; मात्र त्यामुळे झालेला मानसिक आघात खूप मोठा असतो. अशाच मानसिक आघातातून मध्य प्रदेशातल्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. तो काँग्रेस आमदार ओमकार मरकम यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी राहत होता. तिथे राहून तो उपचार घेत होता, तसंच शिक्षणही घेत होता. सरकारी आमदार निवासात ही घटना घडल्याने पोलिस कसून तपास करत असून, त्याने आत्महत्या केली आहे की यामागे दुसरं काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.
रविवारी (25 डिसेंबर) रात्री उशिरा ही घटना घडली. तीरथ असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो गेल्या सुमारे 4 वर्षांपासून भोपाळमधल्या श्यामला हिल्स इथे असलेल्या आमदार ओमकार मरकम यांच्या अधिकृत सरकारी निवासस्थानी राहत होता. त्याने आपल्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचं चिठ्ठीत लिहिलं आहे. ती सुसाइड नोट पोलिसांना त्याच्या मृतदेहाशेजारी मिळाली. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.
सुसाइड नोटमध्ये तीरथने आपले आई-वडील, काका-काकू आणि आजी-आजोबांची माफी मागितली आहे. सगळ्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं; मात्र आपण त्यांना नीट ओळखू शकलो नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. पोस्टमॉर्टेम झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती श्यामला हिल्स पोलिस स्टेशनचे प्रभारी उमेश यादव यांनी सांगितलं.
वाचा - रंग फिका पडल्याने आला सशय; औरंगाबादेत 2 किलो सोन्याची मूर्ती बदलल्याने खळबळ
घटनास्थळी मिळालेली सुसाइड नोट हस्ताक्षरतज्ज्ञांकडे परीक्षणासाठी पाठवण्यात आल्याचंही यादव यांनी सांगितलं. ही नोट तीरथनेच लिहिली आहे, की आणखी कोणी लिहिली आहे की कोणी त्याच्यावर दबाव टाकून त्याच्याकडून लिहून घेतली आहे, आदी बाबी त्या परीक्षणातून स्पष्ट होतील. या परीक्षणातून काही पुरावे किंवा वेगळे संकेत मिळाले, तर संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगळ्या दिशेने केला जाऊ शकतो. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशीही केली जात आहे.
तीरथने आपल्या नोटमध्ये सर्वांची माफी मागितली आहे. 'आई-बाबा, काका-काकू मला माफ करा. मी कधीही चांगला मुलगा बनू शकलो नाही. प्लीज मला माफ करा. मी तुम्हा सर्वांना खूप त्रास दिला. आता मी जात आहे. बाबा, तुम्ही स्वतःची आणि आई-आजीची काळजी घ्या. मी आता तुम्हाला आणखी त्रास देऊ इच्छित नाही. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. सर्वांशी चांगलं राहा. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप काही केलं. मीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखू शकलो नाही. या बाबतीत कोणावरही कायदेशीर कारवाई करू नये. मी माझ्या आजारपणाला कंटाळून जात आहे,' असं तीरथने चिठ्ठीत लिहिलं आहे. 'माझ्या मित्रांनाही सांगा, की मी आता या जगात नाही,' असं लिहून तीरथने सहा-सात मित्रांचीही नावं त्यात लिहिली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhopal News, Suicide