अविनाश कानडजे, औरंगाबाद औरंगाबाद, 25 डिसेंबर : तुम्ही आतापर्यंत अनेक चोरीच्या घटना पाहिल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, औरंगाबाद मध्ये घडलेली घटना वाचून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. औरंगाबादच्या कचनेर येथील श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरातून सोन्याची दोन किलो वजनाची चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती चोरट्यांनी लांबवली. मात्र, चोरी पकडली जाऊ नये म्हणून त्याजागेवर दुसरी मूर्ती आणून ठेवली. या प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत. पोलीस अधीक्षक यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तपासाचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यभर गाजलेल्या जालना जिल्ह्यातील जांबसमर्थ गावातील राम मंदिर चोरी प्रकरणात गेल्या महिन्यात शोध लागला असताना आता पुन्हा औरंगाबादच्या कचनेर येथील जैन मंदिरातील मूर्तीची अदलाबदल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे घटना? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती ही मंदिरात एका जागी स्थिर राहत नसून, मंदिरात आलेले भक्त ही मूर्ती अभिषेक करण्यासाठी घेत असत. विशेष म्हणजे जैन मंदिरात तशी प्रथा आहे. बाहेरून येणारे भक्त अभिषेक करण्यासाठी सोन्याची मूर्ती या भक्तांकडून त्या भक्तांकडे दिल्या जाते आणि त्यातूनच एकाने ही हातचलाखी केली. मंदिरातले सीसीटीव्ही आणि अभिषेक केलेल्या सर्वांचा तपास करून लवकर शोध घेऊ, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात कचनेर येथील चिंतामणी पार्श्वनाथ मंदिरात पंचकल्याणक महोत्सव पार पडला. यावेळी चतुर्मासासाठी आलेले सौभाग्यसागर महाराज यांनी समाजाला सुवर्णमूर्ती बसवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला समाजातील व्यक्तींनी प्रतिसाद दिला. त्यानंतर 2 किलो 33 ग्राम सोने जमा केले होते. त्यातून मूर्ती बसवण्यात आली होती. वाचा - औरंगाबाद : पत्नीचा गर्भपात करण्यासाठी पतीचे धक्कादायक कृत्य, महिलेचा मृत्यू सुरक्षा असतानाही मूर्तीची चोरी मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी बंदूकधारी सुरक्षा रक्षक, लोखंडी गेट व सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. नित्यनियमाने भाविक दर्शन घेत होते. पूजा अर्चा सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसापासून मूर्तीचा रंग उतरायला लागला. त्यामुळे संशय बळावला होता. शनिवारी तपासणी केली असता ही खरी सोन्याची मूर्ती नसून पितळाची मूर्ती असल्याचे स्पष्ट झालं. मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना देखील हा प्रकार घडला आहे. या दरम्यान सीसीटीव्ही बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे.
15 डिसेंबर रोजी मंदिरातील सीसीटीव्ही काही काळासाठी अचानक बंद झाले होते. ते पुन्हा दुरुस्त करण्यात आले. मात्र, या घटनेच्या काही दिवसानंतरच मूर्तीचा रंग उतरायला लागला आणि चोरट्यांनी मूर्ती बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अडीचशे वर्ष जुन्या असलेल्या मंदिरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.