दोन-तीन दिवसांपासून भुकेल्या, अर्धवट शुद्धीत असलेल्या वृद्ध माता-पित्यांची ही कहाणी डोळ्यात पाणी आणेल. दोन मुलं असूनही या वृद्धांना रस्त्यावर अक्षरशः टाकून देण्यात आलं होतं.
उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यातील बिल्सी शहरातली ही घटना. आई-वडिलांना घरातून हाकलून दिल्यानंतर ते वीट भट्टी मजुरांसाठी असलेल्या एका झोपड्यात आसऱ्याला आले. गेले 3 दिवस पावसात असंच ओल्या जमिनीवर झोपून काढावे लागले.
बिल्सी पोलीस ठाण्याचे CO अनिरुद्ध सिंह यांना ही बातमी कळली आणि त्यांनी तत्काळ या वृद्धांना वैद्यकीय मदत देऊन पुढची सोय लावली.
शारदा आणि रामनाथ अशी या दोघांची नावं आहेत. त्यांना खरं तर दोन मुलं. एक मुलगा उझानी इथे बाबा बनून राहिला आहे आणि दुसरा मुलगा बिल्सी इथे राहतो.
हे वृद्ध पती आणि पत्नी बर्याच दिवसांपासून भुकेले आहेत, हे कळल्यावर पोलीस सीओ अनिरुद्ध सिंह तिथे पोहोचले. पोलिसांनीच दोन्ही वृद्धांना आपल्या हातांनी आंघोळ घातली, नवीन कपडे घातले आणि जखमांवर मलमपट्टी केली. आता त्या दोन्ही वृद्धांना बास बरोलियातील वृद्धाश्रमात नेण्यात आलं आहे.