नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने 2.77 एकर वादग्रस्त भूभाग रामलल्लाच्या न्यासाला देण्याचा निर्णय दिला आहे. याशिवाय मुस्लीमांना 5 एकर जागा देण्याचे आदेश दिले आहेत. ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाच्या निकालपत्राचे वाचन साडेदहा वाजता सुरू करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने याची सुनावणी केली. त्यानंतर आज त्याच्या निकालपत्रावर या सर्व न्यायाधीशांनी सह्या केल्या. वादग्रस्त जागेवर शिया वक्फ बोर्डाचा मालकी हक्काचा दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसेच याठिकाणी असलेलं बांधकाम गैर इस्लामिक होतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. शिया वक्फ बोर्डाची याचिका पाचही न्यायाधीशांनी फेटाळली. सुन्नी वक्फ बोर्ड आणि राम लाल्ला विराजमान यांचे दावे निकाली काढले जातील आणि दिलासा दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतिम निर्णय आहे. तरीही यानंतर कायदेशीर मार्ग उपलब्ध असतील. जर पक्षकारांचे या निर्णयाने समाधान झाले नाही तर 30 दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करता येते. या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी झाली तर त्याच्या निर्णयानंतरही पक्षकारांकडे आणखी एक पर्याय असेल. पुनर्विचार याचिकेतही पक्षकारांचे समाधान झाले नाही तर क्यूरेटिव्ह पिटिशन दाखल करता येते. यासाठी पुन्हा 30 दिवसांची मुदत मिळते. निर्णयावर पुनर्विचार याचिता दाखल करणाऱ्या पक्षाला सर्वोच्च न्यायालयात निकालातील त्रुटी सिद्ध कराव्या लागतील. पुनर्विचार याचिकेमध्ये वकिलांकडून कोणताही प्रतिवाद केला जात नाही. अगोदर देण्यात आलेल्या निर्णयाच्या फाईल आणि रेकॉर्ड याचाच विचार केला जातो. कोणत्याही पक्षाला या प्रकरणात पुनर्विचार याचिकेच्या निर्णयावर आक्षेप असेल तर क्यूरेटिव्ह पिटिशन दाखल करता येते. या सुनावणीवेली कोणत्याही तथ्यावर विचार केला जात नाही तर कायदेशीर बाबी तपासल्या जातात. कायदे तज्ज्ञांच्या मते क्यूरेटिव्ह पिटिशन म्हणजे मोठ्या पीठासमोर सुनावणी असा होतो. क्यूरेटिव्ह पिटिशनमध्ये तीन वरिष्ठ न्यायाधीश सुनावणी करतात आणि त्यात इतर निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचा समावेश असतो. अशा प्रकारे जर क्यूरेटिव्ह पिटिशन दाखल झाली तर तीन वरिष्ठ न्यायाधीश आणि तीन सध्याचे न्यायाधीश असे सहा जण मिळून सुनावणी करतात.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर राखतो. पण समाधानी नसल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटंल आहे. निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी चर्चा करणार असल्याचे सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी यांनी सांगितलं. कोण आहेत अयोध्या प्रकऱणाचा ऐतिहासिक निकाल देणारे 5 न्यायाधीश? VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

)







