Ayodhya Verdict Result : कोण आहेत अयोध्या प्रकऱणाचा ऐतिहासिक निकाल देणारे 5 न्यायाधीश?

Ayodhya Verdict Result : कोण आहेत अयोध्या प्रकऱणाचा ऐतिहासिक निकाल देणारे 5 न्यायाधीश?

Ayodhya Verdict Result : ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाच्या निकालपत्राचे वाचन शनिवारी साडेदहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालय आज साडेदहा वाजता ऐतिहासिक अयोध्या प्रकरणी निकालपत्राचे वाचन करणार आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीच्या या वादावर निर्णय देण्यात य़ेणार आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने संकेतस्थळावर या प्रकरणाबद्दलची माहिती दिली आहे.

अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला 5 ऑगस्टला सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणावर नियमित सुनावणी झाली आहे. 40 दिवस चाललेल्या या सुनावणीनंतर 17 ऑक्टोंबरला निर्णय राखून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने याची सुनावणी केली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई या घटनापीठाचे अध्यक्ष असून त्यांच्याशिवाय न्यायाधीश एसए बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश एस अब्दुल नजीर, न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या घटनापीठाचे अध्यक्ष आहेत. 2018 मध्ये तेव्हाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरुद्ध ऐतिहासिक पत्रकार परिषद घेणाऱ्या चार न्यायाधीशांपैकी ते एक आहेत. रंजन गोगोई हे 46 वे सरन्यायाधीश आहेत. 1978 साली वकिली सुरु करणाऱे गोगोई 2001 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. पुढे वर्षभरात ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. या कार्यकाळात निवडणूक ते आरक्षण सुधारणा यासारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या निर्णय प्रक्रियेत रंजन गोगोई होते.

रंजन गोगोई निवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश म्हणून न्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती होणार आहे. ते सुद्धा या घटनापीठाचे सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असलेले बोबडे हे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई आणि महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूरचे कुलपतीसुद्धा आहेत. याआधी ते मध्यप्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ 23 एप्रिल 2021 ला संपणार आहे.

न्यायाधीश डीवाय चंद्रचूड 13 मे 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले होते. याआधी 2013 पर्यंत ते इलाहाबाद उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश तर मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. खासगीपणाचा अधिकार हा मौलिक अधिकार अशी घोषणा करणाऱ्या नऊ सदस्यांच्या पीठामध्येही न्यायाधीश चंद्रचूड यांचा समावेश होता. विशेष म्हणजे एका प्रकरणात त्यांचे वडिल माजी सरन्यायाधीश वाय वी चंद्रचूड यांनी दिलेला निकालही त्यांनी बदलला होता. वाय वी चंद्रचूड हे देशातील सर्वाधिक काळ सरन्यायाधीश असणारी व्यक्ती होते.

अयोध्या प्रकरणात सुनावणी कऱणाऱ्या घटनापीठात न्यायाधीश अशोक भूषण यांचाही समावेश आहे. 1979 पासून प्रॅक्टिस करणाऱ्या अशोक भूषण यांनी 2001 मध्ये इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर 2014 मध्ये केरळ उच्च न्यायालयात बदली झाली. त्यांनंतर त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणून बढती झाली. 2016 पासून अशोक भूषण सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.

घटनापीठाच्या पाच सदस्यांमध्ये न्यायाधीश एस अब्दुल नजीर हेसुद्धा आहेत. 1983 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात त्यांनी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. न्यायाधीश नजीर यांची 2003 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.

VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 09:38 AM IST

ताज्या बातम्या