अयोध्या, 05 फेब्रुवारी : अयोध्येत राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य अशा मंदिराची उभारणी होत आहे. २०२४ च्या जानेवारी महिन्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती गर्भगृहात स्थापन होईल. मात्र ती कोणत्या स्वरुपात असेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासूनव नेपाळवून आणण्यात आलेल्या दोन मोठ्या शिळांची चर्चा देशभरात होत आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांकडून या शिळांची पूजा केली जात आहे. पण राम भक्तांकडून जो दगड शाळीग्राम असल्याचं म्हटलं जातंय तो शाळीग्राम नसून देवशीला असल्याचा दावा दगडांवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी केला आहे.
नेपाळच्या काली गंडकी नदीतून दोन मोठ्या शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. दोन्ही शिळा अयोध्येतील रामसेवकपुरम इथं ठेवल्या आहेत. यातील एक शिळा २६ टनांची तर दुसरी शिळा १४ टनांची आहे. साधु-संत, महंत आणि राम भक्तांमध्ये याचीच चर्चा होत आहे. या शिळांमधून प्रभू रामचंद्रांसह चार भावांच्या प्रतिमा साकारल्या जाणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळेच मूर्ती तयार करण्यास सुरुवात होण्याआधीच त्याची पूजा- अर्चा केली जात आहे. पण यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी मूर्तीच्या निर्मितीचा दावा फेटाळून लावला आहे.
हेही वाचा : राम मंदिरात रामलल्ला कधी विराजमान होणार? योगी आदित्यनाथ यांनी सांगितली तारीख
भूगर्भ शास्त्रज्ञ डॉक्टर कुलराज चालीसे यांनी न्यूज १८ लोकलशी बोलताना म्हटंलं की, अनेक महिन्यांपासून या मोठ्या शिळांवर संशोधन करत आहे. अयोध्येत आणलेल्या या शिळा मौल्यवान अशा आहेत. या देवशीळा असून लोखंडी अवजारांनी यातून मूर्ती निर्माण करणं अशक्य आहे. या शिळांमधून मूर्ती तयार करायची असेल तर हिरा कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा वापर करावा लागेल. देवशीळा ७ हार्नेसच्या आहेत. त्यामुळे यावर लोखंडी छिन्नीने मूर्ती कोरता येणार नाहीत, कारण लोखंडात ५ हार्नेस आढळतात.
डॉक्टर कुलराज चालीसे यांनी सांगितलं की, गेल्या जून महिन्यापासून आमची टीम या दगडांवर रिसर्च करत आहे. जेव्हा आम्ही अयोध्येत आलो तेव्हा नेपाळच्या गंडकी नदीत आढळलेल्या शाळीग्राम शिळेपासून श्रीरामांची मूर्ती तयार केली जाणार असल्याचं समजलं. तेव्हापासून आम्ही रिसर्च करत असून आम्ही पहिला अहवालसुद्धा सोपवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18