मुंबई, 1 ऑक्टोबर: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागानं मध्य प्रदेशामधील उमरिया जिल्ह्यातील बांधवगडच्या जंगलांत दुसऱ्या ते पाचव्या शतकादरम्यान कोरण्यात आलेल्या 26 लेण्यांसह 26 प्राचीन मंदिरांचा शोध घेतला आहे. पुरातत्त्व विभागाच्या संशोधनावेळी हजारो वर्षांपूर्वीचा 26 मंदिरांचा समूह सापडला आहे. त्यात भगवान विष्णूंच्या निद्रिस्त मूर्तीसह वराहाच्या मूर्तीही सापडल्या आहेत. पुरातत्त्व विभागाचा हा शोध अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. बांधवगडच्या जंगलातील सुमारे 170 चौरस किलोमीटर परिसरात हे संशोधन करण्यात आलं. 1938 मध्ये सर्वांत आधी शोधमोहिमेसाठी या परिसराची निवड करण्यात आली होती. बांधवगड व्याघ्र प्रकल्प 1100 चौरस मीटरमध्ये पसरलेला आहे. सध्या एक झोन तलागरमध्ये शोधमोहीम सुरू आहे. येथे सापडलेल्या प्राचीन दगडी गुहा मानवाने बनवलेल्या आहेत. यामध्ये बौद्ध धर्माशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत. व्याघ्र प्रकल्प असल्याने काम करण्यास अडचणी येतात. मात्र, वन विभागाच्या परवानगीने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पुरातत्त्व विभागाचे अधिकारी शिवकांत वाजपेयी यांनी दिली. दरम्यान, पुरातत्त्व विभागाला सापडलेली ही 26 मंदिरं कलचुरी काळातील म्हणजेच नवव्या ते 11व्या शतकादरम्यानच्या बौद्ध काळातील मंदिरं असल्याचं म्हटलं जातंय. दोन बौद्ध मठ, दोन स्तूप, 24 ब्राह्मी लिपी, 46 मूर्ती आणि दुसऱ्या शतकापासून 15 व्या शतकातील 19 जलसंरचना सापडल्या आहेत. सापडलेल्या 46 मूर्तींपैकी सर्वांत मोठी मूर्ती वराहाची आहे. ही सर्व मंदिरं व मूर्त्या राजा भीमसेन, महाराज पोता श्री, महाराज भट्टदेव यांच्या काळातील असल्याचा अंदाज पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संशोधकांनी वर्तवला आहे. हेही वाचा: Navratri 2022: नवरात्रीत चुकून उपवास मोडला तर काय कराल?
एवढंच नव्हे तर इथे 6.4 मीटर लांब, 5.03 मीटर उंच आणि 2.77 मीटर रुंद वराहाची मूर्ती सापडली आहे. आतापर्यंत सापडलेल्या वराहाच्या मूर्तींपेक्षा ती अनेकपटींनी मोठी आहे. या शिवाय बांधवगडमध्ये सापडलेले दोन नवीन मंदिर समूह हे इथल्या मंदिरांच्या स्थापत्यकलेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा शोध असल्याचं म्हटलं जातंय. तर, या सर्वेक्षणात सापडलेली मंदिरं आणि मठ बांधवगडमधील मट्टमयूर पंथाच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात.
पुरातत्त्व विभागाने या सर्व मूर्ती आणि गुहांबद्दल प्राथमिक माहिती सांगितली आहे. ही सर्व मंदिरं, मठ, स्तूप, मूर्त्या आणि लेण्यांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर याच्याबद्दलची तपशीलवार माहिती जाहीर केली जाईल. तसंच हे पुरातन बांधकाम सर्व कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या पंथाचं आहे, याबाबतची माहितीही तेव्हाच कळू शकेल.