काँग्रेसमध्ये धुसफुस वाढली, 23 बडे नेते पक्ष नेतृत्त्वाला देणार कडक इशारा!

काँग्रेसमध्ये धुसफुस वाढली, 23 बडे नेते पक्ष नेतृत्त्वाला देणार कडक इशारा!

राहुल गांधी यांचं वक्तव्य तसेच पक्षातील 23 बड्या नेत्यांकडं (G 23) होत असलेलं दुर्लक्ष यामुळे काँग्रेसमधील धुसफुस वाढली आहे. जम्मूमध्ये (Jammu) शनिवारी हे सर्व नेते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

  • Share this:

जम्मू, 27 फेब्रुवारी : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उत्तर आणि दक्षिण भारतावर केलेल्या वक्तव्याचा वाद काँग्रेस पक्षांतर्गतच पेटला आहे. राहुल गांधी यांचं वक्तव्य तसेच पक्षातील 23 बड्या नेत्यांकडं (G 23) होत असलेलं दुर्लक्ष यामुळे काँग्रेसमधील धुसफुस वाढली आहे. जम्मूमध्ये (Jammu) शनिवारी हे सर्व नेते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. या शक्तीप्रदर्शासाठी गुलाब नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि राज बब्बर हे उत्तर भारतीय नेते जम्मूमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर हरियणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा आणि मनिष तिवारी देखील जम्मूत येणार आहेत. जम्मू ही गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे नाराज नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी हे अगदी योग्य शहर मानले जात आहे.

राहुल गांधींवर रोष

काँग्रेसमधील नाराज नेत्यांचा मुख्य रोष राहुल गांधी यांच्यावर आहे, अशी माहितीही समोर आली आहे. काँग्रेसमध्ये सध्या जे काही घडतंय ते गेल्या वर्षी पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या कराराचं उल्लंघन आहे, असा या नेत्यांचा दावा आहे. त्याचबरोबर उत्तर आणि दक्षिण भारत एक आहे, असंही या नेत्यांना या बैठकीतून राहुल गांधी यांना दाखवून द्यायचे आहे.

आझाद यांना मिळालेल्या वागणुकीवर नाराज

गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची मुदत काही दिवसांपूर्वी संपली. त्यांना अन्य राज्यातून पुन्हा खासदार करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या नेतृत्त्वानं मानला नाही. त्यामुळे देखील पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी आहे.

आझाद यांचे उत्तराधिकारी म्हणून आनंद शर्मा हे प्रबळ दावेदार होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहुल गांधी यांच्या जवळच्या मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं. त्याचबरोबर अनेक निवडणुकांच्या वेळी पक्ष या वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेत नाही, असाही या नेत्यांचा दावा आहे.

(हे वाचा : रॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तर कुठून लढणार निवडणूक? या दोन जागांवर आहे नजर )

निवडणूक निकालांची प्रतीक्षा करणार?

निवडणूक आयोगानं शुक्रवारीच काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस या निवडणुकीत कशी कामगिरी करतो याकडं या नेत्यांचं लक्ष असेल. काँग्रेसनं या निवडणुकीत विजय मिळवला तर असंतोष कमी होईल. अन्यथा या निवडणूक निकालानंतर नाराज नेत्यांची धुसफुस आणखी तीव्र होईल, असं मानलं जात आहे.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 9:35 AM IST

ताज्या बातम्या