Home /News /national /

रॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तर कुठून लढणार निवडणूक? या दोन जागांवर आहे नजर

रॉबर्ट वाड्रा राजकारणात आले तर कुठून लढणार निवडणूक? या दोन जागांवर आहे नजर

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) राजकारणात येणार असल्याची घोषणा त्यांनी नुकतीच केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    जयपूर, 26 फेब्रुवारी : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यानंतर आता रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) देखील राजकारणात येणार आहेत. त्यांनी स्वत: ही घोषणा केली आहे. रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती आहेत. वाड्रा यांनी जयपूरच्या प्रसिद्ध मोती डूंगरी गणेश मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर News 18 शी बोलताना त्यांनी राजकारणात  प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा जर राजकारणाच्या रिंगणात उतरले तर, कुठून निवडणूक लढवणार याबाबतचे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात पडायला सुरुवात झाली आहे. याबाबतचा खुलासा वाड्रा यांनी स्वतः केला आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की, पक्षातील काहींच्या मते त्यांनी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून निवडणूक लढवावी असं वाटत आहे, तर काहींच्या मते त्यांनी गाझियाबाद येथून निवडणूक लढवावी असं वाटत आहे. याबाबत नेमकं कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवणार याबाबत स्पष्टपणे त्यांनी माहिती दिली नाही. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काळात उत्तर प्रदेशातील निवडणूकीच्या रिंगणातील महत्त्वाची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. याचवेळी दुसरीकडे, प्रियांका गांधीही सॉफ्ट हिंदूत्वाचा मुद्दा रेटताना दिसत आहेत. त्यामुळेच सहारनपूर येथील शाकुभंरी देवीसोबतच बिहारी सारख्या मठ मंदिरांचं दर्शनही घेतानाही त्या दिसत आहेत. शिवाय शेतकरी समुदायाशी जोडलेल्या हिंदू -मुस्लीम, शीख, जाट-गुर्जर यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता त्यांचा मोर्चा दलित बांधवांकडे वळला आहे. हे ही वाचा -'25 वर्ष विचार केला नाही पण आता राजकारणात येणार,' रॉबर्ट वाड्रांची घोषणा त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वाराणसीचा दौरा करणार आहेत. रविदास जयंतीच्या निमित्ताने त्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदार संघात जाणार आहेत. याठिकाणी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील संत शिरोमणी गुरू रविदास मंदिराला भेट देणार आहेत. त्याचवेळी तिथे देशभरातून येणाऱ्या हजारो दलित बांधवांशी च्या चर्चा करणार आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Politics, Priyanka gandhi, Robert vadra, Uttar pradesh

    पुढील बातम्या