राजमहेंद्रवरम (आंध्र प्रदेश), 16 मार्च: आजकालच्या तरुणांना बाइकचं खूप वेड असल्याचं पाहायला मिळतं. बाइकला मोठा आवाज असलेले सायलेन्सर (bike silencers) लावण्याचा तरुणांमध्ये जणू ट्रेंडच आला आहे. पण या सायलेन्सरच्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होतं त्याचसोबत रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या नागरिकांना देखील त्रास होतो. मोठ्या आवाजातील सायलेन्सर असलेल्या गाड्यांना अनेक ठिकाणी बंदी आहे. अशा प्रकारचे सायलेन्सर असलेल्या बाईक चालवून कॉलेजच्या तरुणींना इम्प्रेस करणाऱ्या तरुणांना आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) ट्रॅफिक पोलिसांनी (traffic police) चांगलाच धडा शिकवला आहे.
आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या राजामहेंद्रवरम येथील ट्रॅफिक पोलिसांनी मोठा आवाज असलेले सायलेंसर लावलेल्या बाईकवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या पोलिसांनी तब्बल 50 बाईकचे सायलेंसर काढून ते रस्त्यावर ठेवून रोड रोलरच्या सहाय्याने त्यांना चिरडले आहे. अशाप्रकारचे सायलेंसर वापरण्यास आळा बसावा यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं आहे.
राजामहेंद्रवरम येथील डीसीपी (ट्रॅफिक) के. व्ही. एन वरप्रसाद यांनी आयएएनएसला मुलाखत देताना सांगितले की, 'तरुण मुलं या मोठ्या आवाजातील सायलेंसर लावलेल्या बाईक चालवतात. विशेषत: महिला कॉलेजच्या बाहेर अशाप्रकारच्या बाईकमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे. अशा प्रकारच्या सायलेंसर असलेल्या 50 बाईक आम्ही ताब्यात घेतल्या. या बाईकचे सायलेंसर काढले आणि ते रोड रोलरखाली चिरडले.'
डीसीपी पुढे म्हणाले, 'या लाउड सायलेंसर असलेल्या बाईकच्या आवाजामुळे खूप त्रास होतो. मी शहरातील आर्ट्स कॉलेज आणि एसकेव्हीके कॉलेजच्या जवळच राहतो. या ठिकाणी अशाप्रकारच्या बाईक वापरण्याचे प्रमाण जास्त आहे.' तसंच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'मला माहिती आहे की नागरिकांना या आवाजामुळे किती त्रास होतो. त्यामुळेच आम्ही अशाप्रकारचे लाउड सायलेंसर लावलेल्या बाईकवर कारवाई करण्यास सुरुवात केली.'
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आणि उच्च डेसिबल वाहने ओळखण्यासाठी डीजीपीच्या कार्यालयाने वाहतूक पोलिसांना डिजिटल ध्वनी पातळी मोजण्याचे एक यंत्र दिले. 80 डिसीबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्या बाईकचे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या म्हणून वर्गीकरण केले. ज्यामुळे पोलिस अशा बाईक चालवणाऱ्यांवर कारवाई करु शकतील आणि बाईक मालकाच्या समोर त्या सायलेंसरचा नाश करु शकतील.
बुधवारी झालेल्या पहिल्या मोहिमेमध्ये ट्रॅफिक पोलिसांनी 50 बाईकवर कारवाई केली. तर पुढच्या आठड्यात दुसरी मोहिम राबविण्यात येणार आहे. डीसीपी वरप्रसाद म्हणाले की, 'या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांकडून बाईक ताब्यात घेतली जाईल आणि या बाईकचे सायलेन्सर तोडून ते नष्ट केले जाईल. त्याचप्रमाणे मोटर वाहन कायद्यांतर्गत एक हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला जाईल.'
(हे वाचा:खून प्रकरणी भाजप तालुकाध्यक्षाला बेड्या;उपसरपंचपदाच्या निवडणुकीत झाली होती हत्या)
सायलेन्सर काढण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी मॅकेनिकला कामासाठी ठेवले आहे. तसंच सायलेंन्सरला चिरडण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी पालिका कंत्राटदारांच्या मदतीने रोड रोलर मागवला आहे. कारवाईनंतर पोलिसांनी बाईक मालकांना जाण्याची परवानगी दिली आणि कंपनी स्पेसिफाइड सायलेंसर लावण्यास सांगितले.
बुधवारी शहराच्या मध्यभागी ट्रॅफिक पोलिसांनी रस्त्यावर 50 सायलेन्सर ठेवून त्यावर रोड रोलर फिरवल्याचे चित्र पहायाला मिळाले. 'अशा प्रकारची मोहीम करणे आवश्यक आहे. या कारणामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या मनात भिती निर्माण होईल आणि ध्वनी प्रदूषण होणार नाही,' असं डीसीपींनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, India, Traffic police