वॉशिंग्टन, 10 जून : आपल्याकडे विशेष ज्ञान किंवा कौशल्य असेल आणि कमी वयातच त्याला खतपाणी घातलं, तर स्वतःला सिद्ध करून भव्यदिव्य काही तरी उभं करणं ही आजच्या काळात पूर्वीइतकी कठीण गोष्ट राहिलेली नाही. म्हणूनच कमी वयात स्टार्टअप्स उभारलेल्या आणि ती यशस्वी करून दाखवलेल्या अनेक तरुणांची उदाहरणं पाहायला मिळतात. त्यातलं अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजे अलेक्झांडर वांग (Alexandr Wang) हा 25 वर्षांचा अमेरिकन युवक. अलेक्झांडर हा सर्वांत तरुण सेल्फ मेड अब्जाधीश (Seld Made Billionaire) असल्याचं फोर्ब्ज मासिकाने अलीकडेच घोषित केलं आहे. ‘दैनिक भास्कर’ने याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अलेक्झांडर वांग याची कहाणी प्रेरक आहे. त्याने फार कमी वयातच आपल्या कामाला सुरुवात केली होती. वयाच्या 17व्या वर्षीपासूनच Quora या वेबसाइटसाठी फुल टाइम कोडिंग (Coding) करायला सुरुवात केली होती. Quora मध्ये काम करतानाच तिथेच काम करणाऱ्या लुसी ग्युओशी अलेक्झांडरची ओळख झाली आणि त्या दोघांनी मिळून स्केल एआय नावाची कंपनी सुरू केली. नावात असल्याप्रमाणेच एआय अर्थात Artificial Intelligence चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करून विश्लेषणाचं काम ही कंपनी करते. मानवी क्षमतेच्या तुलनेत किती तरी प्रचंड गतीने ही कंपनी सॅटेलाइट इमेजचं विश्लेषण करते. रशिया-युक्रेन यांच्यामध्ये गेले काही महिने युद्ध सुरू आहे. त्यात किती नुकसान झालं आहे, हे अलीकडेच या कंपनीने युक्रेनला विश्लेषण करून सांगितलं आहे. फॉर्च्युन मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, वांग यांची कंपनी अमेरिकेचं हवाई दल, अमेरिकेचं लष्कर, जनरल मोटर्स आदींसह 300हून अधिक कंपन्यांना डेटा अॅनालिसिसची (Data Analysis) सेवा पुरवते. वांग यांच्या कंपनीला आता 6 वर्षं झाली आहेत. एवढ्या कालावधीत या कंपनीने 847 कोटी रुपयांची तीन काँट्रॅक्ट्स पूर्ण केली आहेत. गेल्या वर्षी 2500 कोटी रुपयांचं फंडिंग मिळाल्यानंतर कंपनीने 770 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. आता कंपनीचं मूल्य वाढून 56,210 कोटी रुपये एवढं झालं आहे. त्यात वांग यांचा हिस्सा 15 टक्के म्हणजेच जवळपास 7700 कोटी रुपयांच्या आसपास आहे. लहानपणापासूनच हुशार अलेक्झांडरला आज हे यश मिळालं असलं, तरी त्याची चुणूक लहानपणापासूनच दिसत होती. तो मूळचा आशियाई वंशाचा. लहानपणी त्याला गणिताची आवड होती. त्याला आई-वडिलांनी प्रोत्साहन दिलं. त्याचे आई-वडील भौतिकशास्त्रज्ञ होते. ते अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत सैन्यासाठी शस्त्रास्त्रं तयार करण्याच्या प्रोजेक्टवर काम करत होते. त्याच प्रयोगशाळेमध्ये अमेरिकेने दुसऱ्या जागतिक महायुद्धासाठी पहिला अणुबॉम्ब तयार केला होता. आता अलेक्झांडरची कंपनीही सैन्याला मदत करते. गणिताची आवड असल्याने सहाव्या इयत्तेत असल्यापासून अलेक्झांडर नॅशनल मॅथ्स आणि कोडिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होत होता. त्यात जिंकल्यास डिस्ने वर्ल्डचं फ्री तिकीट मिळायचं. त्या आकर्षणासाठी तो स्पर्धेत खेळत राहायचा. त्याला त्यात कधीच यश मिळालं नाही; मात्र त्यातून त्याला कोडिंगबद्दल आवड निर्माण झाली. त्यातूनच त्याने 17व्या वर्षापासून Quora साठी कोडिंगचं काम सुरू केलं. मशीन लर्निंग शिकण्यासाठी अलेक्झांडरने MIT (मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या संस्थेत प्रवेश घेतला. पहिलं वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या उन्हाळी सुट्टीत त्याने स्केल एआय ही कंपनी सुरू केली. त्याने शिक्षण सोडून हे उद्योग करणं आई-वडिलांना पसंत नव्हतं; मात्र दर वर्षी उन्हाळ्यात जसं करतो, तसा हा उपक्रम उन्हाळ्यापुरताच मर्यादित असेल, असं त्याने आई-वडिलांना सांगितलं. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. कारण कंपनीला फंडिंग मिळालं आणि त्याने कंपनीचंच काम पुढे चालू ठेवलं. त्यामुळे त्याचं शिक्षण पूर्ण झालंच नाही. ‘जगभरात अस्ताव्यस्त विखुरलेली माहिती म्हणजे एखाद्या जहाजात भरलेल्या कागदपत्रांसारखी आहे. आम्ही तो डेटा गोळा करून कंपन्यांसाठी त्याचं विश्लेषण करतो,’ अशा शब्दांत अलेक्झांडर आपल्या कामाची ओळख करून देतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.