नवी दिल्ली, 24 जून: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांनी आंतरराष्ट्रीय बैठकीत पाकिस्तानची चांगलीच पंचाईत केली. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांना संपवायचा प्लॅन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायापुढे पाकिस्तानच्या देखतच ठेवला आणि सहाजितच पाकचा तिळपापड झाला. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-महंमद या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांविरोधात (Terrorist Organisation) एक कृती आराखडा बुधवारी (23 जून) प्रस्तावित केला. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन (SCO) या संघटनेच्या सदस्य देशांच्या सुरक्षाविषयक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक ताजिकिस्तानची (Tajikistan) राजधानी दुशान्बे (Dushanbe) येथे झाली. त्या वेळी डोवाल यांनी SCO आराखड्याचा भाग म्हणून हा कृती आराखडा मांडला.
आंतरराष्ट्रीय दहशतवाद, फुटीरतावाद आणि अतिरेकी विचारसरणी यांविरोधातली लढाई एकत्रितपणे लढण्याची प्रतिज्ञा या वेळी सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केली. डोवाल यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध केला. सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ले आणि एकंदरीतच दहशतवादाच्या पुरस्कर्त्यांना धडा शिकवला पाहिजे, असं डोवाल म्हणाले.
कोरोनामुळे दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा मृत्यू; तिसऱ्याची प्रकृती गंभीर
डोवाल म्हणाले, 'शस्त्रास्त्रांच्या तस्करीसाठी ड्रोन्सचा वापर, डार्क वेबचा गैरवापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, सोशल मीडिया या तंत्रज्ञानाचा वापर दहशतवाद्यांकडून केला जातो. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या नवतंत्रज्ञानाच्या अशा वापरावर लक्ष ठेवलं पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांची पूर्णतः अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तसंच संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या व्यक्ती आणि संस्था-संघटनांवर कारवाई करायला हवी.'
दहशतवादाला होणारा निधीचा पुरवठा रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणकं स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. SCO आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स यांच्यातला सामंजस्य कराराराचाही त्यात समावेश असावा, असं त्यांनी सुचवलं.
डोवाल म्हणाले, 'भारत SCO या संघटनेचा सदस्य 2017मध्ये झाला; मात्र SCOमध्ये आता जे सदस्य देश आहेत, त्यांच्याशी भारताचे पूर्वीपासूनच प्रत्यक्ष, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि तात्त्विक संबंध अस्तित्वात आहेत. अफगाणिस्तानात (Afganistan) गेल्या दोन दशकांत साध्य केलेलं यश टिकवण्याची गरज असून, तिथल्या लोकांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. SCOच्या अफगाणिस्तानासंदर्भातल्या संपर्क गटाला भारताचा पूर्णतः सहकार्य असून, हा गट अधिक सक्रिय व्हायला हवा.'
'चाबहार बंदर, INSTC, प्रादेशिक हवाई कॉरिडॉर, अश्गाबात करार यांसारख्या पुढाकारांमधून वाढवलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे (Connectivity) आर्थिक विकासाला आणि परस्परांवरचा विश्वास दृढ होण्याचा चालना मिळते. अर्थात कनेक्टिव्हिटीने सार्वभौमत्व (Sovereignity) आणि प्रादेशिक एकात्मतेचा (Regional Integrity) आदर केला पाहिजे,' अशी अपेक्षाही डोवाल यांनी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब हेही या वेळी झालेल्या वैयक्तिक बैठकीला उपस्थित होते. त्यात प्रादेशिक सुरक्षेविषयीचे महत्त्वाचे मुद्दे, अफगाणिस्तानातली परिस्थिती आदींवर चर्चा झाली.
SCO ही आठ सदस्य देश असलेली आर्थिक आणि सुरक्षाविषयक विषयांवर आधारलेली संघटना असून, मोठ्या प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये गणली जाऊ लागली. NATO ला शह देणारी संघटना म्हणून SCO कडे पाहिलं जातं. भारत आणि पाकिस्तान हे 2017मध्ये SCOचे कायमस्वरूपी सदस्य बनले. शांघायमध्ये 2001 साली झालेल्या परिषदेत रशिया, चीन, किरगिझ रिपब्लिक, कझाकस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांच्या अध्यक्षांनी SCO ची स्थापना केली.
SCO आणि त्या संघटनेच्या प्रादेशिक दहशतवादविरोधी रचनेच्या अनुषंगाने सुरक्षाविषयक सहकार्य दृढ करण्यात भारताने खूप रस दाखवला आहे. सुरक्षा आणि संरक्षण (Security & Defence) या विषयांसंदर्भात ही रचना काम करते. 2005 साली भारताला SCO मध्ये निरीक्षक अर्थात Observer ही भूमिका देण्यात आली होती. युरेशियन प्रदेशातल्या (Euresian Region) सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मंत्रिस्तरावरील बैठकांना भारताची उपस्थित असायची.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit doval, Pakistan, Terrorist