मराठी बातम्या /बातम्या /देश /

Air India च्या ‘फ्लाइट अल्कोहोल सर्व्हिस पॉलिसी’मध्ये मोठा बदल; एकदाच मिळणार..

Air India च्या ‘फ्लाइट अल्कोहोल सर्व्हिस पॉलिसी’मध्ये मोठा बदल; एकदाच मिळणार..

फाईल फोटो

फाईल फोटो

एअर इंडियानं आपल्या अल्कोहोल सर्व्हिसमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 25 जानेवारी : टाटा ग्रुपची एअरलाईन कंपनी असलेली 'एअर इंडिया' गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मद्यधुंद प्रवाशानं एका महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणानंतर एअर इंडियानं आपल्या अल्कोहोल सर्व्हिसमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणात, गरज असेल तेव्हा विचारपूर्वक अल्कोहोल देण्याच्या सूचना केबिन क्रूला देण्यात आल्या आहेत. या बदलानंतर विमान प्रवासादरम्यान प्रवाशांना काळजी घेऊन एकदाच दारू दिली जाईल. त्यांना पुन्हा दारू देण्यास नकार देताना जास्त समंजसपणे काम केलं जाईल. जे प्रवासी स्वतः आणलेलं मद्य प्राशन करत असतील त्यांच्यावर क्रू मेंबर्स नजर ठेवतील, असं एअर इंडियाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

न्यूयॉर्क ते दिल्ली विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशानं महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याच्या घटनेच्या संदर्भात डीजीसीएनं एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडलेल्या या घटनेच्या संदर्भात कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या फ्लाइट सर्व्हिसेसच्या संचालकांनाही तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

'पी गेट' प्रकरणानंतर संबंधित फ्लाईटच्या पायलटवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या पायलटचं निलंबन रद्द करण्याची विनंती कर्मचारी संघटनांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे (डीजीसीए) केली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातील सहा कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंचानं या प्रकरणातील मुख्य पायलटचा परवाना निलंबित करण्याचा आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. डीजीसीएला पाठवलेल्या पत्रात संयुक्त मंचानं घटनेतील विविध पैलूंचा संदर्भ देत मुख्य पायलटचं निलंबन आणि कडक शिक्षा मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा - धक्कादायक! SpiceJet च्या विमानात एअर होस्टेसशी गैरवर्तन; VIDEO

डीजीसीएला पत्र पाठवणाऱ्या संस्थांमध्ये इंडियन पायलट्स गिल्ड, इंडियन कमर्शियल पायलट्स असोसिएशन, एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन, एअर इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन आणि एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. एअर इंडियानं या प्रकरणाची चौकशी बंद केल्याचं सांगितल्यानंतर संयुक्त मंचानं हे पत्र पाठवलं आहे.

दरम्यान, अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एअर इंडियान आपल्या 'अल्कोहोल सर्व्हिस पॉलीसी'मध्ये बदल केले आहेत. शिवाय, या प्रकरणातील आरोपी प्रवाशावर प्रवासबंदीची कारवाईदेखील केली आहे.

First published:

Tags: Air india, Domestic flight, Travel, Travel by flight