अहमदाबाद, 22 मार्च : मागील वर्षी कोरोनामुळे (Corona) संपूर्ण देशभरात भीती निर्माण झाली होती. त्यावेळी अनेक लोकांना घरीच राहावं लागलं होतं. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम सामाजिक, अर्थिक तसंच कौटुंबिक अशा अनेक घटकांवर झाला. यामुळे अनेक समस्याही निर्माण झाल्या. त्यावेळी या रोगाविषयी पुरेशी माहिती नसल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. काही रुग्णांना कौटुंबिक, सामाजिक पातळीवर त्रासदेखील सहन करावा लागला होता. या कालावधीत कोरोनाचा संसर्ग झाल्याने संबंधित रुग्णाला त्याच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढल्याच्या देखील घटना घडल्या होत्या. असाच एक प्रकार गुजरातमधील अहमदाबादच्या (Ahmedabad) इसनपूर भागात घडल्याचं समोर आलं आहे. एका नर्सला (Nurse) कोरोना झाल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला घराबाहेर काढलं. आता तिच्या कुटुंबातील सदस्य तिला पुन्हा घरात घेऊ इच्छितात मात्र यासाठी त्यांनी तिच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आहे.
(वाचा - आता 4 आठवड्यांनंतर Covishield चा दुसरा डोज नाही, केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स )
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील इसनपूर भागात राहणाऱ्या 27 वर्षीय नर्सने याबाबत खोखरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने म्हटलयं की, खोखरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी 2020 मध्ये तिचा विवाह झाला. ज्यावेळी तिचा विवाह झाला त्यावेळपासूनच ती मणिनगर येथील एलजी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. सासरकडील मंडळींना तिचं हे काम करणं पसंत नव्हतं. त्यामुळे तिच्या सासरचे लोक तिला त्रास देत होते. एप्रिल 2020 मध्ये जेव्हा या नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं त्यावेळी तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं. आता तिच्या सासरच्या मंडळींचं म्हणणं आहे, की तिला परत सासरी यायचं असेल तर तिने 10 लाख रुपये सोबत आणावेत किंवा घटस्फोट (Divorce) घ्यावा.
(वाचा - वाढतोय कोरोनाचा धोका! पुढील अनेक वर्षे वापरावा लागणार मास्क, तज्ज्ञांचा इशारा )
‘मी माझ्या सासरच्या लोकांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते समजून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे मला दुःख झालं असून मी सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून मी माहेरी राहत असून, मला माझा पती भेटायला देखील आलेला नाही’, असं त्या नर्सने सांगितलं आहे.