आग्रा, 24 डिसेंबर: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील आग्रा (Agra) याठिकाणी असणाऱ्या एका आश्रमावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आश्रमानं आश्रयाची याचना करत रात्रभर दाराबाहेर बसलेल्या महिलेला कोणतीही दयामाया न दाखवता प्रवेश नाकारल्याचा गंभीर आरोप आश्रम व्यवस्थापनावर केला जात आहे. याबाबत आश्रमावर सर्वत्र टीका होत असून, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून देखील अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.
मीडिया अहवालातील माहितीनुसार, मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) 42 वर्षांच्या या महिलेनं दहा वर्षापूर्वी दीक्षा घेऊन घर परिवाराचा त्याग केला आणि आपलं आयुष्य एका आश्रमासाठी घालवण्याचा निर्णय घेतला. या महिलेला एक मुलगी असून ती माउंट अबू इथं शिकते. ही महिला गेली अनेक वर्षे आश्रमातच वास्तव्यास होती; पण काही काळापूर्वी ती घरी गेली. त्यानंतर तिनं पुन्हा आश्रमात परतण्याचा निर्णय घेतला आणि तिनं घरच्या लोकांना आपल्याला आग्रा (Agra) इथल्या आश्रमात सोडण्यास सांगितलं. त्यानुसार सोमवारी तिची नणंद तिला आग्रा इथं आश्रमात सोडण्यासाठी आली. आग्रा इथला हा आश्रम नेमका कुठे आहे हे त्यांना सापडत नव्हतं. बरीच शोधाशोध करून त्यांनी हा आश्रम शोधला आणि मंगळवारी दुपारी त्या ताजगंज भागातील एकता पोलीस चौकीच्या हद्दीत असलेल्या आश्रमात पोहोचल्या.
(हे वाचा-नव्या वर्षाच्या स्वागताला ड्रिंक्स घेऊन गाड्या चालवायचा विचारही करू नका)
तेव्हा आश्रमाच्या संचालकांनी या महिलेला प्रवेश नाकारला, असं या अहवालात म्हटलं आहे. या महिलेनं आश्रमाशी असलेले संबंध तोडलेले असून, पुन्हा तिला आश्रमात राहण्याची परवानगी देता येणार नाही, असं सांगत संचालकांनी महिलेला आश्रमात घेतलं नाही. ही महिला मात्र आश्रमातच राहण्याचा हट्ट धरून आश्रमाच्या दारातच बसून राहिली. पूर्ण रात्र ती आणि तिची नणंद दारात बसून राहिल्या. पण आश्रमाच्या व्यवस्थापनाला पाझर फुटला नाही आणि त्यांनी या दोन्ही महिलांवर दयामाया न दाखवता त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं, असा गंभीर आरोप केला जात आहे.
गावकऱ्यांचा महिलेला पाठिंबा
अखेर गावातील लोकांना ही बातमी समजताच तेही तिथं आले आणि त्यांनीही आश्रमानं या महिलेला प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका घेतली. पण आश्रम प्रशासन ढिम्म राहिलं. गावातील लोकांनी या महिलेला हा वाद सुटेपर्यंत आपल्या घरी राहण्यासही सांगितलं; पण आश्रमासाठी आयुष्य वाहून घेतल्याचं सांगत ही महिला आपल्याच हट्टावर अडून राहिली. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आल्यावर तेही तिथं पोहोचले. त्यांनीही आश्रमाचे संचालक आणि महिला यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही यश आलं नाही. त्यामुळे सर्वांचं लक्ष या प्रकरणाकडं लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pardesh, Woman, Women, Women safety