नवी दिल्ली, 24 डिसेंबर : नव्या वर्षाच्या स्वागताला घरगुती का होईना पार्टीचा प्लॅन असेल आणि थोडी फार ड्रिंक्स घेतलीत तरी रस्त्यावर गाडी घेऊन यायचा विचारही करून नका. ड्रिंक अँड ड्राइव्ह केसेसचा समाचार घेण्यासाठी पोलिसांनी बाह्या सरसावल्या आहे. कोरोना काळात (Coronavirus) पोलिसांनी (cops) असं करणाऱ्यांना पकडण्यासाठी नवनवे क्रिएटिव्ह मार्ग शोधून काढलेत.
कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) ब्रेथ अलायझर्सचा (breathalyzers) वापर धोकादायक बनला आहे. कारण त्यासाठी तोंडात पाइप घालून तपासणी करावी लागते. अशा वेळी विविध राज्यातील पोलीस नव्या वर्षांच्या पार्टीजच्या पार्श्वभूमीवर ड्रिंक एन्ड ड्राइव रोखण्यासाठी विविध युक्त्या शोधून काढत आहेत. सध्या ख्रिसमस (Christmas) आणि नव्या वर्षाच्या (New year) तोंडावर पार्ट्यांचं प्रमाण वाढणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी कंबर कसली आहे.
चालक दारू प्यायला आहे की नाही ते तपासण्यासाठी पश्चिम बंगालच्या पोलिसांनी एक नामी युक्ती शोधून काढली आहे. कारचालकांना कुठेही उतरून हाताची बोटं मोजायला ते सांगत आहेत. याशिवाय संशयित व्यक्तींना सरळ रेषेत चालायलाही सांगितलं गेलं. या पोलिसांना माणसांच्या हालचालीवरून त्यांची अवस्था ओळखण्याचा वर्षानुवर्षांचा अनुभव असतो. या दोन्हीपैकी कुठल्याही परीक्षेत समोरची व्यक्ती नापास झाली तर त्याला जवळच्या रुग्णालयात अल्कोहोल टेस्ट करायला नेलं जाईल.
टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार,कोलकत्याच्या पोलिसांना शुक्रवारी ड्रिंक एन्ड ड्राइव करणाऱ्यांना शोधण्याचे नवनवे प्रकार समोर आणण्यास सांगितले गेले. कोलकत्याचे पोलिस बऱ्याच महिन्यांपासून कोरोनाला रोखण्यासाठी ब्रेथ अलायजर्सचा वापर टाळत आहेत. आता मात्र त्यांनी नवीन मार्ग शोधले आहेत.
लाल डोळे
गुजरात इथल्या पोलिसांनीही मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी तयारी केली आहे. ते संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींचे डोळे तपासणार आहेत. जर डोळे लाल असतील, तर त्यांची पुढील तपासणी केली जाईल. अहमदाबाद इथले काही पोलिस पूर्वी व्यक्तींना शिंकायला लावून त्यांच्या श्वासाच्या वासावरून त्यांनी मद्य पिलं आहे किंवा नाही हे ओळखायचे. मात्र आता कोरोनाच्या काळात या पद्धतीवर निर्बंध आणले आहेत. त्याऐवजी पोलिस मद्यपींच्या बोलताना अडखळणे, डोळे लाल असणे किंवा चालताना अडखळणे वा नीट उभं न राहू शकणे अशा लक्षणांवर भर देत आहेत.
नवे ब्रेथ अलायजर्स
कोरोनाच्या काळात विविध राज्यांमधील पोलिस नव्या प्रकारच्या ब्रेथ अलायजर्सचा वापर करत आहेत. यात एकाहून अधिक पाइप्सचा वापर केलेला असतो. मात्र येत्या काळात वाढणार असलेलं पार्ट्यांचं प्रमाण पाहता हे नवे ब्रेथअलायजर्सही कमी पडतील की काय असं चित्र आहे. आणि पोलिसांना धुवून तेच ब्रेथअलायजर्स पुन्हापुन्हा वापरावे लागले तर त्यातून संसर्गाचा धोका वाढणार आहे.
अजून एक अधिक सुरक्षित ब्रेथअलायजर पश्चिम बंगालमध्ये आलं आहे. या साधनात एखाद्या व्यक्तीने ५ सेंटीमीटर लांबीवरून फुंकल्यावर त्याने मद्यपान केले आहे किंवा नाही हे कळते. मात्र मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधनकारक असताना पोलिस अशा तंत्रज्ञानापेक्षा त्यांच्या व्यक्तीला पाहून गोष्टी ओळखण्याच्या कौशल्य आणि क्षमतांवरच जास्त विसंबून राहतील हे नक्की.