नवी दिल्ली, 17 मार्च: तुम्ही तुमचं आधार कार्ड पॅनकार्डसोबत लिंक (Aadhar pan link) केलंय का?, नसेल केलं तर ते तुम्हाला लवकरात लवकर करावं लागणार आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 22 आहे. त्याआधी तुम्हाला ही दोन्ही कार्डं एकमेकांसोबत लिंक करणं अनिवार्य असेल. तुम्ही दिलेल्या वेळेत कार्ड लिंक केली नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. याशिवाय जर तुम्ही 31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक केलं नाही तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 31 मार्चपर्यंत आधारशी पॅन लिंक न केल्यास, पॅनकार्ड कोणत्याही कामाचं राहणार नाही. परिणामी, तुम्ही अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. तुम्ही बँक खातं उघडू शकणार नाही आणि शेअर्स (shares) तसंच म्युच्युअल फंडांमध्ये (mutual fund) गुंतवणूकही करू शकणार नाही. त्यामुळे 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करून घ्या. कर तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या निष्क्रिय पॅन कार्डचा कुठेही उल्लेख केला तर तुमच्याकडे पॅन क्रमांक नाही, असं गृहित धरलं जाईल. त्यासाठी तुम्हाला आयकर कायदा, 1961 अंतर्गत दंडही भरावा लागू शकतो. कलम 272B अंतर्गत पॅन न उघडल्यास किंवा न दिल्यास 10,000 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. त्यामुळे तुम्हाला पॅन आधारशी लिंक करावंच लागेल. 31 मार्चनंतरही तुम्ही तुमचं पॅन आधारशी लिंक करू शकता, मात्र यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड भरल्यानंतर आणि लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचं पॅन कार्ड पुन्हा अॅक्टिव्ह होईल आणि तुम्ही त्याचा वापर करू शकाल. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. आधारशी पॅन लिंक करणं का आवश्यक आहे? 2017 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पॅनला आधारशी लिंक करण्याचा कायदा करण्यात आला होता. यासाठी आयकर कायद्यात 139AA हे नवीन कलम जोडण्यात आलं. कलम 139AA नुसार, प्रत्येक व्यक्ती ज्याला 1 जुलै 2017 पर्यंत पॅनकार्ड जारी केलं गेलं आहे आणि जो आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र आहे, त्यांना आपलं पॅन आधारशी लिंक करणं आवश्यक आहे. एवढंच नाही तर आयकर रिटर्न (ITR) भरताना आधार क्रमांक नमूद करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे ही दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक असणं आवश्यक आहे. पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया - सर्वप्रथम आयकर ई-फायलिंग पोर्टल उघडा – https://incometaxindiaefiling.gov.in/ - आधी नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी करा. तुमचा पॅन क्रमांक हा तुमचा युजर आयडी असेल. - युजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा. - आता तुम्हाला एक पॉप अप विंडो दिसेल, जी तुम्हाला तुमचं पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल. विंडो दिसत नसल्यास, मेन्यूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘लिंक आधार’ वर क्लिक करा. - पॅनकार्डवरील डिटेल्सनुसार नाव, जन्मतारीख आणि लिंग या गोष्टी आधी नमूद केल्या जातील. - त्यानंतर भरलेले डिटेल्स व्हेरिफाय करा. आधार कार्ड आणि पॅन कार्ड यामधील जे डिटेल्स एकमेकांपेक्षा वेगळे असतील, ते तुम्हाला कागदपत्रांमध्ये दुरुस्त करावे लागतील. - डिटेल्स जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक टाका आणि “link now”वर क्लिक करा. - नंतर एक पॉप-अप मेसेज येईल, जो तुम्हाला सांगेल की तुमचं आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झालं आहे. - तुमचं पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्ही https://www.utiitsl.com/ किंवा https://www.egov-nsdl.co.in/ लाही भेट देऊ शकता. तर, अशाप्रकारे तुम्ही तुमचं पॅन आधारशी लिंक करू शकता. मात्र, लक्षात ठेवा की 31 मार्च 22 पर्यंत जर तुम्ही आधार-पॅन लिंक केलं नाहीत, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.