चेन्नई, 15 मे : तमिलनाडूमधील (Tamilnadu News) थूथुकुडी जिल्ह्यात एक 57 वर्षीय महिला गेल्या 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरत असल्याचं समोर आलं आहे. तमिळनाडूतील पुरुष प्रधान समाजात आपल्या मुलीला एकटीने सांभाळण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेबाबतची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. लग्नाच्या 15 दिवसांनंतर पतीचा मृत्यू… एस पेचियाम्मल नावाच्या महिलेच्या पतीचा मृत्यू लग्नाच्या 15 दिवसातच झाला होता. तेव्हा ती अवघी 20 वर्षांची होती. तिला पुन्हा लग्न करायचं नव्हतं. ती कटुनायक्कनपट्टी नावाच्या गावातून आहे. येथे पुरुष प्रधान समाज होता. काही महिन्यांनंतर तिने एका मुलीला जन्म दिला. तिचा सांभाळ करण्यासाठी काम करू लागली. पुरुषांनी त्रास दिल्यानंतर झाली पुरुष गावात काम करणं महिलेला सोपं नव्हतं. येथील लोक तिला त्रास देत होते. मुलीला वाढविण्यासाठी तिने बांधकामाच्या ठिकाणी काम करणं सुरू केलं. तर कधी ती हॉटेल, चहाच्या दुकानातही काम करीत होती. मात्र येथे सर्वच ठिकाणी तिला पुरुषांकडून त्रास दिला जात होता. त्यामुळे पेचियाम्मलने ठरवलं की, ती पुरुष होऊन राहील. ती तिरुचेंदुर मुरुगन मंदिरात गेली, आणि तेथे केस दान केले. आणि साडीच्या ऐवजी शर्ट आणि लुंगी घालण्यास सुरुवात केली. पेचियाम्मलने आपलं नाव बदलून मुथु केलं. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, नाव बदलल्यानंतर तब्बल 20 वर्षे कट्टुनायक्कनपट्टी गावात येऊन राहू लागली. फक्त तिच्या जवळचे नातेवाईक आणि मुलीला सत्य माहिती होतं. असे 30 वर्षे निघून गेले. यानंतर ती जिथंही काम करे, तिला लोक अण्णा म्हणून हाक मारत होते. तिने पुढे सांगितलं की, मी चहाचं दुकान, हॉटेल अशा 100 ठिकाणी तरी मजुराचं काम केलं. मुलीला चांगलं जगता यावं, यासाठी मी पैसे जमा करत होते. काही दिवसांनंतर मुथुचं माझी ओळख बनली. याशिवाय आधार, वोटर आयडी आणि बँक अकाऊंटसह सर्व कागदपत्रांवर माझं हेच नाव आहे. पेचियाम्मलची मुलगी शणमुगासुंदरीचं आता लग्न झालं होतं. मात्र अजूनही पेचियाम्मल पुरुषांच्या वेशात राहते, तिला आता असच जगायचं आहे. मरेपर्यंत मी मुथुच बनून राहणार असल्याचं ती सांगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.