अनुज गौतम, प्रतिनिधी सागर, 25 जून : आयुष्यात एकदा तरी विमानात बसावं, घरच्यांना विमानात बसवावं, असं तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. तर, ज्यांचा विमान प्रवास झालेला आहे, त्यांच्यासाठी पहिल्यांदा विमानात बसण्याचा क्षण अविस्मरणीय असतो. मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील एका 62 वर्षीय व्यक्तीचं हे स्वप्न साकार झालं आहे, तेही अगदी मोफत. ‘देवानेच हा प्रवास घडवून आणला’, असं ते म्हणतात आणि त्याला कारणही तसंच आहे. मध्यप्रदेश राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत लॉटरी सिस्टमने 32 जणांना विमानाने मोफत तीर्थयात्रा करण्याची संधी मिळाली. त्यात 62 वर्षीय कमल कुमार अहिरवार यांचीही निवड झाली होती. कमल कुमार हे सागर बस स्थानकाजवळील तलावाकाठी भुईशेंगा विकतात. वर्षानुवर्षे हेच काम करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
कमल यांना तीर्थयात्रेला जाण्याच्या 3 दिवसांआधी जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची यात्रेसाठी निवड झाल्याचा फोन आला होता. आपण विमानाने मथुरेला जाणार असल्याचं त्यांना कळविण्यात आलं होतं. ही बातमी ऐकताच त्यांचा आनंद जणू गगनात मावेनासा झाला. 2 दिवस ते व्यवस्थित झोपलेही नाहीत. सागरहून 32 भाविकांना भोपाळला पाठविण्यात आलं. भोपाळ विमानतळाहून आग्रा विमानतळावर आल्यानंतर त्यांना भाविकांच्या गाडीतून मथुरा वृंदावनाची सफर देण्यात आली. गाईला मारत होता लाथ; शेवटी व्यक्तीची इतकी भयानक अवस्था झाली की उठताही येईना, Shocking Video कमल कुमार म्हणाले, ‘माझ्यासारखे सर्वसामान्य लोक स्वप्नातही विमानात बसण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र तीर्थ दर्शन योजनेत माझी निवड झाली आणि त्यानिमित्ताने विमानातून प्रवास करण्याची संधी मिळाली. हा विमान प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील सुखद क्षणांपैकी एक होता. विमानातून मी भोपाळ ते आग्र्याचा प्रवास केला. भगवान श्रीकृष्णांच्या मथुरेला जाण्याची संधी मिळाली. ही देवाचीच कृपा आहे. त्यांच्याच आशीर्वादाने मला ही तीर्थयात्रा करता आली.’