कोलकाता,22 डिसेंबर : कायद्यानुसार आपल्या देशामध्ये मुलींच्या लग्नाचं योग्य वर्ष 18 वर्षे आणि मुलांचं 21वर्षे ठरवण्यात आलेलं आहे. तरीदेखील अनेकजण या कायद्याचं उल्लंघन करतात. आजही सर्रासपणे अल्पवयीन मुलींची लग्नं लावून दिली जातात. शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. तिथे गेल्या शनिवारी (17 डिसेंबर) एका अल्पवयीन मुलीचं तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुलीच्या वर्गमित्रांच्या दक्षतेमुळे हा प्रयत्न फसला. पीडित मुलीच्या वर्गातील सर्व मुला-मुलींनी या लग्नात हस्तक्षेप केला. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गोलार येथील ‘गोलार सुशीला हायस्कूल’मध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होती. गेल्या आठवडाभरापासून ती शाळेत गैरहजर होती. ही गोष्ट तिच्या मित्र-मैत्रिणींच्या लक्षात आली. तिचं लग्न ठरल्याचं समजताच या विद्यार्थ्यांनी तिच्या घरी धाव घेतली. त्यांनी मुलीच्या पालकांकडे तिला शाळेत पाठवण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी नकार दिला. ही मुलं उपद्रव देऊ शकतात, हे लक्षात आल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी तिला गुपचूप मागच्या दारानं नियोजित वराच्या घरी नेलं. (पतीला सोडून 2 मुलांची आई प्रियकरासोबत फरार झाली अन् फसली; Love Story चा झाला भयानक शेवट) ही बाब विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी वराच्या घरी जाऊन बेमुदत आंदोलन करण्याची धमकी दिली. पुढील मनस्ताप टाळण्यासाठी वराच्या कुटुंबीयांनी मुलीला तिच्या वर्गमित्रांच्या हवाली केलं. त्यांनी तिला परत त्यांच्यासोबत शाळेत नेलं. अशा पद्धतीनं शाळकरी मुलांनी आपल्या मैत्रिणीची लग्नापासून सुटका केली. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश चंद्र पडिया यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. मुलांच्या निश्चयामुळेच हे लग्न टळल्याचं ते म्हणाले. केशपूर ब्लॉकचे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर दीपक कुमार घोष यांनीही या प्रकरणी लक्ष घातलं आहे. “मुलगी 18 वर्षांची होण्यापूर्वी तिच्या कुटुंबानं तिचं लग्न न करण्याचं वचन दिलं आहे,” अशी माहिती घोष यांनी दिली. (भिंतींवर लघवी करू नये म्हणून देवदेवतांची चित्रे लावावीत का? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय) मुलीच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. आर्थिक अडचणींमुळेच त्यांनी तिचं लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वीच भारतामध्ये मुला-मुलींच्या लग्नाच्या वयामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं मांडला आहे. नवीन प्रस्तावानुसार मुलींचं लग्नाचं वय 18वरून 21 तर मुलांचं 21 वरून 23 करण्याचा विचार केला जात आहे. बाल विवाह आणि मुलींशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचं म्हटलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.