नवी दिल्ली, 19 डिसेंबर : आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे ही मोठी समस्या आहे. कितीही कायदे आणि नियम त्याला रोखू शकले नाहीत. यावर उपाय म्हणून या ठिकाणी देवदेवतांचे छायाचित्रे लावली जात होती. मात्र, यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी, थुंकणे किंवा कचरा फेकण्यापासून रोखण्यासाठी भिंतींवर देव-देवतांची चित्रे चिकटवण्याची प्रथा बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. याआधीचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. या याचिकेत म्हटले आहे की, लोक लघवी करणे, थुंकणे आणि कचरा फेकणे यापासून रोखण्यासाठी देवदेवतांची चित्रे भिंतीवर लावली जातात, ही प्रथा रूढ झाली आहे. हे समाजासाठी एक गंभीर धोका आहे, कारण असे फोटो लावण्याने हे प्रकार थांबवण्याची हमी नाही, उलट लोक सार्वजनिक ठिकाणी या पवित्र प्रतिमांवर लघवी करतात किंवा थुंकतात. याचिकाकर्ते आणि अधिवक्ता गौरांग गुप्ता म्हणाले, “हे पवित्र फोटोंच्या पावित्र्याचे उल्लंघन करते. लोकांना लघवी करणे किंवा थुंकणे थांबवण्यासाठी भीतीचा वापर केला जातो. एखाद्याच्या धर्मावरील श्रद्धेतून जन्माला आलेली भक्ती आणि त्याचे पालन करण्याचे स्वातंत्र्य लक्षात घेता अशा कृत्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही." वाचा - गायरान जमीन अतिक्रमणाबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय! 24 जानेवारीपर्यंत मुदत.. छायाचित्रे लावणे कायद्याचे उल्लंघन : याचिका सार्वजनिक ठिकाणी लघवी, थुंकणे किंवा कचरा फेकण्यापासून रोखण्यासाठी भिंतीवर पवित्र प्रतिमा लावणे हे भारतीय दंड संहितेच्या कलम-295 आणि 295 अ चे उल्लंघन आहे, कारण त्यामुळे सर्वसामान्यांच्या भावना दुखावल्या जातात, असे याचिकेत म्हटले आहे.
धार्मिक भावना दुखावल्याची चर्चा याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या एका प्रकरणात उघड्यावर लघवीची समस्या मान्य केली होती. आपल्या आदेशात म्हटले आहे की, भिंतींवर देवतांच्या प्रतिमा चिकटवण्याच्या प्रथेमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.