मुंबई, 22 ऑक्टोबर : रोजची धावपळ आणि ताण-तणावातून दोन क्षण सुखाचे, निवांत मिळावेत, यासाठी अनेक जण पर्यटनाला जातात. पर्यटनासाठी जंगल सफारी, निसर्गरम्य स्थळं, ट्रेकिंग किंवा एखाद्या धार्मिक स्थळाची निवड केली जाते. पर्यटनासाठी अनेक जण ट्रॅव्हल कंपनीचं पॅकेज घेतात किंवा स्वतः प्रवासाचं नियोजन करतात; पण सध्या एक कुटुंब विशेष चर्चेत आहे. हे कुटुंब जगप्रवासाला निघालं आहे. या पर्यटनादरम्यान त्यांनी आतापर्यंत अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे. सर्वांत विशेष गोष्ट म्हणजे हे कुटुंब स्वतःच्या विमानानं जगप्रवास करत आहे. एखादी आपत्कालीन स्थिती निर्माण झालीच तर तिचा सामना करण्यासाठी आवश्यक उपकरणं आणि वस्तू या कुटुंबानं सोबत घेतल्या आहेत. एकूणच या कुटुंबाचा हा रोमांचक प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे.
पाच जणांचं एक कुटुंब 14 महिन्यांच्या जगप्रवासाला अर्थात वर्ल्ड टूरला निघालं आहे. या कुटुंबातले सदस्य स्वतः सिंगल इंजिन विमान चालवत हा प्रवास करत आहेत. हे विमान या कुटुंबाच्या मालकीचं आहे. SWINS ने दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबात 59 वर्षांचे इयान, त्यांची 58 वर्षांची पत्नी मिशेल, समांथा (वय 21), सिडनी (वय 18) आणि ख्रिस्तोफर (वय 15) यांचा समावेश आहे. या कुटुंबानं आतापर्यंत 27 हजार किलोमीटर्सपेक्षा जास्त प्रवास केला असून, प्रवासादरम्यान त्यांनी 12 देशांमध्ये विमान लॅंड केलं आहे. या कुटुंबानं जून महिन्यात जगाच्या सफरीला सुरुवात केली असून, आतापर्यंत बहामाज, डोमिनिक रिपब्लिक, यूएस, व्हर्जिन आयर्लंड आणि अर्जेंटिना या देशांमध्ये भ्रमंती केली आहे.
हेही वाचा - जयललिता यांच्या मृत्यूला शशिकला जबाबदार; चौकशी आयोगाचा अहवाल सादर
इयान हे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. SWINS ने आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर या कुटुंबाच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्याचप्रमाणे हे कुटुंब आपल्या प्रवासाची कथा टिकटॉकवर डॉक्युमेंट करत आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन विमान प्रवासासाठी निघालेलं हे कुटुंब त्यांच्यासोबत 'जंगल सर्व्हायव्हल गियर' घेऊन जात असल्याचं टिकटॉकच्या व्हिडिओत दिसत आहे. हे विमान सिंगल इंजिन असल्याने, एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय त्यांच्यासोबत पर्सनल लोकेटर बीकन आहे. तसंच सॅटेलाइट कम्युनिकेशन इक्विपमेंट्सही या विमानात आहेत.
या व्हिडिओतून इयान यांनी आपल्या कुटुंबीयांचे अनुभव शेअर केले आहेत. प्रवासादरम्यान या कुटुंबाला अनेक ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागला. अर्जेंटिनामध्ये या कुटुंबाला विमान उतरण्यासाठी जी धावपट्टी मिळाली ती चिखलाने भरलेली होती. या प्रवासादरम्यान हे कुटुंब जगाकडे आपापल्या दृष्टिकोनातून बघत आहे. या कुटुंबानं अर्जेंटिनातला इगुआजु धबधबा पाहिला. या ठिकाणी एकूण 275 धबधबे आहेत.
कुटुंबानं टिकटॉक व्हिडिओत सांगितलं, की 'आमच्यासाठी बोआ विस्टा (ब्राझील) ते मनाउस (ब्राझील) हा सर्वांत लांबचा विमान प्रवास होता. हे अंतर कापण्यासाठी आम्हाला तीन तास 52 मिनिटं लागली. बदलत्या हवामानामुळे विमान उड्डाण करताना सर्वांत मोठी अडचण जाणवते'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Brazil, Tiktok viral video, Tour