चंदीगड 28 डिसेंबर : सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव थोडा जास्त असतो. अशातच थंडीपासून बचावासाठी खोलीत शेकोटी पेटवल्याने तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. खोलीच्या दारं-खिडक्या बंद करून शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना हरियाणातील बहादूरगडमध्ये घडली आहे. या तिघांच्याही मृत्यूची बातमी सकाळी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. श्वास गुदमरल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. थंडीपासून वाचण्यासाठी तिघांनीही खोलीच्या सर्व खिडक्या बंद केल्या होत्या. तसंच आत लाकडं पेटवून शेकोटी केली होती. सकाळी तिघेही खोलीतून बाहेर न आल्याने ठेकेदाराने येऊन तपास केला असता त्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. झोपेतच कुटुंबावर काळाचा घाला; घराला अचानक लागली आग, 5 जणांचा मृत्यू बहादूरगडमधील सेक्टर-6 पोलीस स्टेशनचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितलं की, मुनेश, कल्लू आणि सैफिजुल मेहेना अशी मृतांची नावं आहेत. मुनेश आणि कल्लू हे उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील मुंडाखेरा गावचे रहिवासी होते. तर, सैफिजुल मेहेना हा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी होता. हे सर्वजण बहादूरगडच्या HSIIDC सेक्टर 16 मध्ये असलेल्या योकोहामा टायर फॅक्टरीत काम करायचे. जवळच असलेल्या कासार गावात राहण्यासाठी त्यांनी भाड्याने खोली घेतली होती. सायंकाळी काम आटोपल्यानंतर तिघेही या खोलीत आराम करत होते. थंडीपासून बचावासाठी खोलीतच शेकोटी पेटवली होती. पण सकाळी खोलीत त्या तिघांचेही मृतदेह आढळले. इमारतीच्या कुंपणावरून थेट कारवर झेप; बिबट्याचा 13 नागरिकांवर भयानक हल्ला, घटनेचा Shocking Video प्राथमिक तपासात हे प्रकरण श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचं दिसतंय, मात्र पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. एवढंच नाही तर फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे. तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी बहादूरगड सार्वजनिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसंच या घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे, असं स्टेशन प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितलं. दरम्यान, थंडीच्या दिवसांत बचावासाठी निवडलेले पर्यायही जीवघेणे ठरू शकतात. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी घरातील दारं, खिडक्या बंद करताना आत खेळती हवा राहील, याची काळजी घ्यायला हवी, नाहीतर ते महागात पडू शकतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.