नवी दिल्ली, 20 मे : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने शुक्रवारी हैदराबाद येथे 2019 साली झालेला एनकाउंटर (Hyderabad Encounter Case) बनावट असल्याचे मानले आहे. आयोगाने यासाठी काही पोलिसांवर ठपका ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल सार्वजनिक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण तेलंगणा उच्च न्यायालयात पाठवले आहे.
26 नोव्हेंबर 2019 च्या रात्री हैदराबादमध्ये 27 वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तर 6 डिसेंबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास पोलिसांनी चार आरोपींना संशयास्पद चकमकीत ठार केले होते. काही दिवसांनंतर, सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश न्यायमूर्ती व्हीएस सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन केला होता.
न्यायमूर्ती सिरपूरकर आयोगाला काम सुरू झाल्यापासून 6 महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. या अर्थाने त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2020 मध्ये पूर्ण होणार होता. मात्र, कोरोनामुळे कामाला विलंब झाला. या वर्षी जानेवारी महिन्यात आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता.
वृद्ध बापानेच झोपेत सून- मुलाचा चिरला गळा; पकडल्यावर म्हणतो, ''साहेब, कारण विचारू नका...''
आज सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा अहवाल उघडला. तेलंगणा सरकारतर्फे ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी हा अहवाल गोपनीय ठेवण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला.
सरन्यायाधीश म्हणाले, "यामध्ये कोणतीही गुप्तता पाळण्याची गोष्ट नाही. आमच्या आदेशानुसार चौकशी झाली आणि काही लोक दोषी आढळले. राज्य सरकारने अहवालाच्या आधारे कारवाई करावी. आम्हाला आता या प्रकरणावर लक्ष ठेवायचे नाही. सर्व पक्षांनी अहवाल वाचून पुढील दिलासा मिळावा म्हणून उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडावे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hyderabad, Police Encounter