नवी दिल्ली, 16 एप्रिल : अयोध्यामध्ये राम मंदिर (Ram mandir) निर्माणाच्या कार्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून (vishwa hindu parishad) देणगीच्या स्वरूपात गोळा करण्यात आलेले जवळपास 15 हजार बँक चेक बाउन्स झाले आहेत. या चेकचे मूल्य 22 कोटी रुपये इतके आहे. चेक खात्यांमध्ये कमी रक्कम असल्याने किंवा काही तांत्रिक चुकांमुळे हे चेक बाउन्स झाल्याचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास ऑडिट रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे. यंदाच्या मकर संक्रांतीपासून राम मंदिर निर्माणासाठी देणगी स्वीकारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याद्वारे करोडो रुपये जमा झाल्याची माहिती आहे. देश-विदेशातून लोकांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी उत्स्फुर्तपणे देणगी देऊ केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसह इतर राज्यातील नेत्यांनीही देणगी दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. चेक बाउन्स बाबत तांत्रिक अडचणींवर बँक कर्मचारी काम करत आहेत. संबंधित देणगीदारांना पुन्हा दान करण्याची विनंती करण्यात येत आहे. यातील जवळपास दोन हजार चेक अयोध्येमध्येच संग्रहित करण्यात आले आहेत, असे न्यासचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठी मुस्लिमांचाही पुढाकार अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेकडून देशात सध्या वर्गणी गोळा केली जात आहे. या मोहिमेमध्ये मुस्लीम समाजातील नागरिकही देखील मागे राहिलेले नाहीत. अयोध्येच्या पवित्र नगरीला धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतिक बनविण्यासाठी वासी हैदर यांच्याकडून 12 हजार, तर शाह बानो यांच्याकडून 11 हजार रुपयांची वर्गणी देण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचे स्वागत केले आहे. “राम मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिमांनी पुढाकार घेऊन दान केले तर नक्कीच हे दोन्ही धर्मातील एकोपा वाढविण्याचे संपूर्ण देशात प्रतिक ठरेल”, असे अन्सारी म्हणाले होते. राम मंदिर निर्माणासाठी देणगी गोळा करण्याचे अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत विश्व हिंदू परिषदेने 15 जानेवारी पासून 17 फेब्रुवारीपर्यंत जमा केलेल्या देणगीमध्ये या चेकचा समावेश आहे. देणगी गोळा करण्याच्या मोहिमेद्वारे जवळपास पाच हजार कोटींची रक्कम जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, न्यासकडून अधिकृतरीत्या कोणतीही आकडेवारी सांगण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.